पालघर, दि. 4 (संजीव जोशी / mahanews Media): पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांनी परराज्यातील एका मजूराला कानशिलात मारले. लाथही मारली. 20 मे रोजीची घटना. 21 मे रोजी ह्या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. प्रसारमाध्यमांनी हा विषय उचलून धरला. आणि मग प्रशासनाला दखल घ्यावी लागली. कोडगे झालेल्या प्रशासनाने माध्यमांना मूर्ख समजून 22 मे रोजी शिंदेना रजेवर पाठवले आणि धूळफेक केली. मग रात गई, बात गई ह्या तत्वाप्रमाणे आठवडा भरात शिंदेना पालघर तहसीलदारपदाच्या खूर्चीवर बसवले. हा खोटारडेपणा करताना, जिल्हाधिकारी आणि महसूल आयुक्त जराही लाजले नाहीत. कदाचित ह्या निर्लज्जपणाला फक्त दोघेच जबाबदार असतील असे नाही. शिंदेवर कोणाचा तरी वरदहस्त असणार हे त्यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.
सुनील शिंदेवर कथीत कारवाईची (जी शुद्ध धूळफेक होती) बातमी आल्यानंतर अनेकांनी त्यांच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली. इतका चांगला अधिकारी केवळ शुल्लक चूकीमुळे अडचणीत आला, इथपासून ते एखाद्या परप्रांतीय मजूराला मारहाण केल्याबद्दल एका मराठी अधिकाऱ्याला शिक्षा कशी होऊ शकते, इथपर्यंत भावना व्यक्त केल्या गेल्या. लोकशाहीची चिंता बाळगणारे देखील अनेकजण हा कंठशोष करणाऱ्यांमध्ये होते. ह्या भावना पहाता आपलीच काही चूक झाली का, आणि सुनील शिंदे गरीब गाय आहे किंवा कसे, हे तपासून पहाण्यासाठी गूगल सर्च केले असता, तेथे संबंधित बातम्यांच्या कितीतरी लिंक सापडल्या. Times of India, Hindustan Times, ABP News, Zee News अशा नामांकित माध्यमांनी सुनील शिंदेच्या मारकुटेपणाच्या बातम्या प्रसिद्ध/प्रसारित केल्या होत्या. इतके असताना, तहसीलदाराला विवाह निमितत्ताचे खोटे कारण दाखवून जिल्हाधिकारी कैलास शिंदेंच्या शिफारशीवरुन कोकण विभागीय महसूल आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडून रजा मंजूर केली जाते आणि तहसीलदार शिंदेना पुन्हा पदभार देवून निवृत्त होतात. हे सर्व गंभीर आहे. पालघर मध्ये टोकनचा झालेला काळा बाजार, प्रवासी पास मिळवण्यात झालेले गैरप्रकार ह्याची व्याप्ती खूप मोठी असण्याचा वास या प्रकरणातून येत आहे.
एकंदरीत सुनील शिंदे प्रकरण ज्या पद्धतीने हाताळण्यात आले ते पहाता, शिंदे गरीब आहे की मारकुटी? हे ओळखणे अवघड असले तरी, ती गाय मात्र नक्की असू शकेल. आणि ह्या गाईच्या दुधाने नक्कीच काहींना बळ मिळाले असेल. ह्या गाईच्या शेणाने काहींची घरे सारवली गेली असतील. इथपर्यंत ठिक आहे, पण जर कोणी शेण खाऊन शिंदेना अभय दिले असेल तर माध्यमे नक्कीच शांत राहणार नाहीत. तूर्तास, शिंदेच्या पराक्रमांबद्दलच्या बातम्यांच्या Links एकत्रितपणे राज्याच्या महसूल मंत्र्यांपर्यत पाठवून काही फरक पडतो का, ते पाहू या!
पालघरचे तहसीलदार सुनील शिंदेच्या मारकुटेपणाबद्दलच्या विविध प्रसार माध्यमांनी प्रसारित/प्रसिद्ध केलेल्या बातम्यांवर नजर मारा!