- 25 हजारांची मशीन 3.29 लाखात घेतल्याचा आरोप
वार्ताहार/बोईसर, दि. 5 : पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणार्या पेपरलेस बारकोड साहित्यांची खरेदी बाजार भावापेक्षा 3 ते 4 पटीने जास्त भावाने केली असून एकुण 1 कोटी 36 लाख 92 हजार 690 रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची बाब जिल्हा परिषदेचे सदस्य तथा माजी उपाध्यक्ष सचिन पाटील यांनी उघडकीस आणली आहे. 25 हजार 31 रुपयांना मिळणारे सदर साहित्य ठेकेदाराच्या संगणमताने 3 लाख 29 हजार रुपयांना खरेदी करत हा घोटाळा करण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून मार्च 2017 मध्ये पालघर जिल्ह्यातील 45 प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये रुग्णांच्या नोंदणीसाठी पेपरलेस बारकोड कार्ड, टोकन सिस्टीम, लॅमिनेशन मशिन, बारकोड स्कॅनर, बारकोड प्रिंटर, स्कॅनर पाऊच पेपर आदींचा संच खरेदी करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यानुसार घाटकोपरमधील न्यूओव्ही फार्मासिटिकल या निविदा धारकाकडून प्रति संचाला सुमारे 3 लाख 29 हजार 313 रुपये प्रमाणे निधी मंजूर करुन एकूण 1 कोटी 48 लाख 19 हजार रुपये किंमतीचे साहित्य खरेदी करण्यात आले होते. मात्र सचिन पाटील यांनी पालघर तालुक्यातील मुरबे केंद्रातील साहित्याची बाजारपेठेत असलेली किंमत तपासली असता प्रिंटर 14 हजार 491, स्कॅनर 1 हजार 239, टेबल टॉप स्कॅनर 3 हजार 752, पेपर रोल 750, लॅमिनेशन मशीन 4 हजार, तर वायरलेस एन-300 राऊटर 799 असे एकूण 25 हजार 31 रुपयांचे असलेले हे सर्व साहित्य 3 लाख 29 हजार 313 रुपयांत खरेदी करण्यात आल्याचा दावा पाटील यांनी केला. जिल्हा परिषदेच्या तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष गायकवाड आणि मुख्य लेखा व वित्त अधिकारी संजय पतंगे यांनी या खरेदीबाबत अनुकूलता दर्शवली असुन या गैरव्यवहाराची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी सचिन पाटील यांनी मागणी केली आहे.
दरम्यान, माजी उपाध्यक्ष पाटील यांनी यापुर्वी जिल्हा परिषदेतील अनुकंपा आणि शिपाई भरती गैरव्यवहार उघडकीस आणला होता.
[divider]
- आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
- दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
- स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!
ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा!