कॉरंटाइन सेंटर मध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध न केल्यास, जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांचा कारवाईचा इशारा

0
8851

पालघर दि 14 : जिल्ह्यातील कॉरंटाइन सेंटर मध्ये पाणी, स्वच्छता, अन्न, वीज पुरवठा या मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात व जनतेला नम्रतेने मदत करण्याचा प्रत्येक अधिकाऱ्याचा हेतू असला पाहिजे. जबाबदारी झटकणाऱ्या व अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी दिला आहे. सेंटरजवळ डॉक्टर उपलब्ध असावा व जिल्हा शल्या चिकित्सक यांनी आठवड्यातून किमान 2 वेळा सेंटरला भेटी द्याव्यात अशा सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.

जिल्ह्यातील सर्व कॉरन्टाईन सेंटरचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक आयोजित केली होती, त्यावेळी बोलताना शिंदे यांनी हा इशारा दिला. कॉरन्टाईन सेन्टर मध्ये सकाळी काढा पिण्यासाठी गरम पाणी, वेळेवर नाश्ता व जेवण उपलब्ध व्हावे, शौचालय व बाथरूमची नियमित साफसफाई व्हावी, चादरी नियमित बदलण्यात याव्यात, मनोरंजनाची सुविधा असावी, सी. सी. टीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत व तात्काळ जनरेटर उपलब्ध करावेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

या कॉन्फरन्समध्ये उपजिल्हाधिकारी किरण महाजन, तहसीलदार (महसूल) उज्वला भगत, जिल्हा शल्य चिकित्सक कांचन वानेरे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, डॉ. सागर पाटील, सर्व प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, उप अभियंता, तालुका वैद्यकीय अधिकारी व कोव्हीड केअर सेंटर साठी नेमणूक केलेले सर्व समन्वय अधिकारी सहभागी झाले होते.