डहाणू : +Ve पोलीसाला क्वारन्टाईन न करता ड्युटीवर ठेवले / अन्य +Ve पोलीसाचे कुटूंबीय अज्ञातवासात

दि. 3 जून: डहाणू पोलीसांनी एका गुन्ह्यात अटक केलेल्या 2 आरोपींचे तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे संबंधीत आरोपींच्या संपर्कात आलेल्या 17 पोलीसांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. अशा सर्व पोलीसांना क्वारन्टाईन करणे आवश्यक होते. मात्र पोलीस प्रशासनाने कुठलीही खबरदारी घेतली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नमुने घेतलेल्या काही पोलीसांना तर चक्क ड्यूटीवर ठेवण्यात आले. दरम्यान, पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या पोलीसांशी दैनंदिन संपर्कात आलेल्या पोलीसांच्या आरोग्याचा देखील प्रश्न निर्माण झालेला आहे. 17 पैकी 6 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर, आता सर्वच पोलीसांची तपासणी करुन घ्यावी अशी मागणी होत आहे.

पॉझिटीव्ह पोलीसाचे कुटूंब क्वारन्टाईनच्या भीतीने अज्ञातस्थळी रवाना: कोरोना वॉरिअर्सच्या भूमिकेतील पोलीसांचे मनोधैर्य वाढविण्यात प्रशासनाला अपयश आलेले आहे. डहाणू पोलीसांपैकी एका पोलीसाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याचे कुटूंबीय घरातून अज्ञातस्थळी गेले असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

जनजागृती ऐवजी भय पसरविण्यात प्रशासन यशस्वी: कोरोना विषयक जनजागृती करण्यात जिल्हा प्रशासनाला पूर्णपणे अपयश आले आहे. जबाबदारीच्या जाणीवेपेक्षा मोठ्या प्रमाणात भय पसरलेले दिसते आहे. चक्रीवादळाच्या संकटकाळातही कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीने डहाणूतील काही लोकांनी निवारागृहात जाण्यास नकार दिला आहे.

क्वारन्टाईन सेंटर विषयी लोकांमध्ये भय:
क्वारन्टाईन सेंटर विषयी आणी तेथील सेवा सुविधांविषयी लोकांमध्ये भय निर्माण झाले आहे. क्वारन्टाईन सेंटरमधील सुविधांबाबत आनंदी आनंदच आहे. जेवणाचा ठिकाणा नाही. ज्याला परवडेल तो बाहेरून जेवण व पाणी मागवेल. दुकानदारांना दर 2 तासांनी परिसर निर्जंतुकीकरण करण्याच्या पोकळ सूचना देणारे जिल्हा प्रशासन क्वारन्टाईन सेंटरमध्ये कितीवेळा निर्जंतुकीकरण करते, हा अभ्यासाचा विषय आहे. निदान तेथील कचरा किती वेळा उचलला जातो, हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे क्वारन्टाईन सेंटर बाबत लोकांच्या मनात भय पसरल्याचे दिसत आहे.