
पालघर, दि. 4 : देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या 31 वर्षीय तरुणाला पालघर पोलिसांनी जेरबंद केले असुन त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे.

एक इसम सोमवारी संध्याकाळी पालघर-बोईसर रस्त्यावरील प्रांत ऑफीस परिसराजवळ गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे, पोलीस हवालदार रविंद्र गोरे, योगेश देशमूख, पोलीस शिपाई रमेश पालवे व सांगळे यांच्या पथकाने दोन पंचासह सदर ठिकाणी जाऊन सापळा रचला असता 6 वाजेच्या सुमारास पथकाला एक इसम संशयितरित्या फिरताना दिसला. त्याच्यावरील संशय बळावल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रविंद्र उर्फ राजेंद्र रामनाथ दिवटे (वय 31) व आपण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगितले. शेवटी पोलिसांनी त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ पॅन्टच्या आतून खोचलेले देशी बनावटीचे सिल्वर रंगाचे मॅगजीनसह पिस्टल आढळून आले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक करत त्याच्याविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय हत्यार कायद्याचे कलम 3,7,25 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.