जिल्हा परिषद सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे निवृत्ती वेतन ऑनलाईन करणार! -अ‍ॅड. काशीनाथ चौधरी

0
2394

डहाणू, दि. 30 : पालघर जिल्हा परिषद अंतर्गत येणार्‍या सेवानिवृत्त शिक्षक व कर्मचार्‍यांचे मासिक निवृत्ती वेतन दरमहा विलंबाने होत असल्याने, पालघर जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी नुकतीच पालघर जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम समितीचे सभापती अ‍ॅड. काशीनाथ चौधरी यांची जिल्हा परिषद कार्यालयात भेट घेऊन सेवानिवृत्त कर्मचारी व शिक्षक यांच्या निवृत्ती वेतनास होत असलेल्या विलंबाबाबत व इतर अन्य प्रश्नांसंदर्भात लेखी निवेदन देऊन तीव्र भावना व्यक्त केल्या.

यावेळी प्रामुख्याने सर्व निवृत्त कर्मचारी व शिक्षकांचे दरमहाचे निवृत्ती वेतन 5 तारखेच्या आत अदा करणे, सातव्या वेतन आयोगानुसार सर्व निवृत्त कर्मचारी, शिक्षकांची वेतन श्रेणी मंजूर करून फरकाची रक्कम त्वरित अदा करणे, सर्व विभागातील कर्मचारी, शिक्षक विशेषतः ग्रामसेवक यांच्या कालबध्द पदोन्नतीचे प्रस्ताव मंजूर करणे आदी बर्‍याच कालावधीपासून प्रलंबित असलेल्या समस्या यावेळी मांडण्यात आल्या. याप्रसंगी उपस्थित असलेल्या जिल्हा परिषदेच्या संबंधित विभागांच्या अधिकार्‍यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी निवृत्ती वेतन मिळण्यास होणारा विलंब आणि त्या अनुषंगाने उपस्थित होणार्‍या विविध आर्थिक समस्या मांडून परिस्थितीचे गांभीर्य अधिकार्‍यांच्या लक्षात आणून दिले.

यावर सर्व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांचे विशेषतः शिक्षकांचे मासिक निवृत्ती वेतन ऑनलाईन करून होणारी दिरंगाई टाळण्यात येईल, सातव्या वेतन आयोगाचे प्रस्ताव येत्या महिन्यात मंजूर करण्यात येतील व कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्तावही लवकरच मंजूर करण्यात येतील, असे अ‍ॅड. काशिनाथ चौधरी यांनी आश्वस्थ केले. तसेच दोन तालुके मिळून दर तीन महिन्यांनी पेन्शन अदालत आयोजित करुन सर्व पेन्शनरांचे प्रश्न मार्गी लावण्यात येतील असेही चौधरी म्हणाले. याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिनेशकुमार थोरात यांनी सांगितले की, निवृत्ती वेतनास होणारा विलंब टाळण्यासाठी आम्ही तातडीने ऑनलाईन प्रक्रियेची कार्यवाही सुरू करत असून भविष्यात निवृत्ती वेतनाच्या कामी विलंब टाळण्यासाठी गांभीर्याने लक्ष दिले जाईल.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी नितीन ओगले, कनिष्ठ लेखा अधिकारी जगन्नाथ वानरे, सहायक लेखाधिकारी भूषण पिंपळे तसेच जिल्हा सेवानिवृत्त कर्मचारी शिक्षक संघटनेच्या वतीने जिल्हा सरचिटणीस बापूराव देवकर, जिल्हा कोषाध्यक्ष मारुती वाघमारे, संघटनेचे हेमंत राऊत, अशोक पाटील, अशोक किणी, शांताराम राऊत, मुनार शेख, युवराज सोनवणे व पुंडलीक पाटील आदी सदस्य उपस्थित होते.