पालघर, दि. 3 : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मनोर हद्दीत दोन आठवड्यांपुर्वी अज्ञात इसमांनी 30 वर्षीय रिक्षाचालकाची निर्घूण हत्या केल्याचा प्रकार समोर आला होता. या हत्येमागचे गुढ उकलण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले असुन अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याने पत्नीनेच आपल्या प्रियकरासोबत कट रचून ही हत्या घडवून आणल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी आरोपी पत्नी, तिचा प्रियकर तसेच अन्य तीन अशा एकुण 5 जणांना अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपी महिला व तिचा प्रियकर वसई पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होते.
पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महामार्गावरील मनोर-ढेकाळे गावाच्या हद्दीत 18 फेबु्रवारी रोजी रात्री 12.15 च्या सुमारास पुंडलिक आनंदा पाटील (रा. वसई) यांचा त्यांच्याच रिक्षात मृतदेह आढळून आला होता. अज्ञात आरोपींनी त्यांची हत्या करुन व मृतदेह रिक्षाच्या पाठीमागील सीटवर ठेऊन रिक्षा रोडलगतच्या नाल्यात ढकलून दिली होती. या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपींवर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 302 (हत्या) नुसार गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याचे गांभिर्य पाहता या प्रकरणाचा तपास पालघरचे उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता.
नाईक यांनी सर्वप्रथम मनोर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार यांची वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना वेगवेगळ्या परिसरात तपासासाठी रवाना केले. या पथकांनी केलेल्या तपासात पुंडलिक पाटील यांच्या पत्नीचे परपरुषाशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पुढे आली व तपासाला गती मिळाली. पोलिसांनी अधिक तपास केल्यानंतर अखेर संबंधित इसमाला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत संपुर्ण घटनाक्रम पोलिसांसमोर बोलून दाखवला. यानंतर पाटील यांची पत्नी व गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर 3 जणांना अटक करण्यात आली.
आरोपींनी दिलेल्या जबाबानुसार, पाटील यांच्या पत्नीचे मुख्य आरोपीशी अनैतिक प्रेम संबंध होते. पत्नीचे दुसर्या पुरुषाशी प्रेमसंबंध असल्याचा संशय आल्यानंतर पाटील वारंवार पत्नीला याबाबत विचारणा करु लागले होते. याच गोष्टीचा राग मनात धरुन पाटील यांची पत्नी, तिचा प्रियकर व अन्य 3 लोकांनी मिळून त्यांच्या हत्येचा कट रचला. आरोपींनी ठरल्याप्रमाणे रिसार्टमध्ये जाण्याचा बहाणा करुन पाटील यांची रिक्षा बोलावून घेतली. यावेळी दोन जण रिक्षात बसले व त्यांनी मनोर येथे काही काम असल्याचे सांगून रिक्षा मनोरच्या दिशेने घेण्याची पाटील यांना विनंती केली. मनोर येथे रिक्षा पोहाचल्यानंतर पाटील यांना काही समजण्याच्या आतच आरोपींनी लोखंडी सळईने त्यांच्या डोक्यात प्रहार करुन त्यांची हत्या केली व मृतदेह रिक्षाच्या मागील सीटवर टाकून रिक्षा रस्त्यालगतच्या नाल्यात ढकलून दिली व तेथून फरार झाले.