पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे जव्हार येथे पत्रकार दिनाचे आयोजन

0
1996

PATRAKAR DINदि. 6 : मराठी भाषेतील आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त 6 जानेवारी हा दिवस सर्वत्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेतर्फे यावर्षी पत्रकार दिन जव्हार येथे साजरा करण्यात आला. जव्हारच्या प्रकृती रिसॉर्ट येथे आयोजीत करण्यात आलेल्या या कार्यक्रमात जव्हारचे माजी नगराध्यक्ष दिनेश भट व मोखाडा येथील जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम उपस्थित होते.
कार्यक्रमात सर्वप्रथम परिषदेचे जिल्हा अध्यक्ष तथा दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यानंतर सर्वांनी जांभेकरांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन केले. यावेळी दिनेश भट यांनी पत्रकारांशी जव्हारच्या विकासासाठी पर्यटनातील संधी आणि आव्हाने या विषयावर आपले विचार मांडले. भविष्यात पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने रोप वे, पॅरा ग्लायडींग, जव्हार महोत्सव सारखे उपक्रम राबविण्याचे प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वाढीव पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न चालू असल्याची माहिती देऊन जव्हारच्या आजूबाजूला औद्योगिक वसाहतीस पोषक वातावरण असल्याचे व त्यासाठीही प्रयत्न चालू असल्याचे भट यांनी यावेळी सांगितले. पर्यटनातूनच जव्हारचा सर्वांगीण विकास होऊ शकतो, अशी भावना व्यक्त करुन मागील 40 वर्षापासून जव्हारला स्थानिक आमदार नाही आणि शासन दरबारी मांडलेल्या विकास योजनांना भक्कम प्रतिसाद मिळत नाही अशी खंतदेखील त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या आधी पत्रकार परिषदेच्या सदस्यांनी जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठान व सिन्जेन्टा फाऊंडेशन यांच्या माध्यमातून होत असलेल्या शेतीच्या प्रयोगांची व कृषी तंत्रज्ञान सहाय्यक आणि कृषी व्यावसायिक यासाठीच्या अभासक्रमांची माहिती घेतली. यानंतर सामुदायिक शेतीचा यशस्वी प्रयोग करुन स्थलांतरावर मात करणार्‍या जव्हार तालुक्यातील बोरीचाघोडा या आदिवासी वस्तीला भेट देऊन शेतीची पाहणी केली. यावेळी संजीव जोशी, हर्षद पाटील, निरज राऊत, पंकज राऊत, शशी करपे, अच्युत पाटील, पी. एम. पाटील, भगवान खैरनार, नामदेव खिलारी, वैभव पालवे, शशिकांत कासार, दिनेश यादव, वैदेही वाढाण, विजय घरत, संजू पवार, दिनेश तारवी, संदीप जाधव, अंकिता वर्तक, मनोज पंडित, शिरीष कोकिळ, उल्हास पाध्ये, मोहन राणे, नवीन पाटील, रुपेश मोकाशी उपस्थित होते.