पालघर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी 24 मार्च पूर्वी महिला आरक्षण सोडत

0
2212

दि. 17 मार्च: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालान्वये पालघर जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या रिक्त झालेल्या गट व गणांसाठी पोटनिवडणुकीची प्रक्रीया सुरु झाली आहे. 18 मार्च पूर्वी प्रक्रीया सुरु करावी अशी निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्याप्रमाणे राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना 23 मार्च रोजी महिला आरक्षणाची सोडत काढण्याचे निर्देश दिले आहेत.

पालघर जिल्हा परिषदेच्या रिक्त झालेल्या 15 जागांपैकी सर्व जागा सर्वसाधारण वर्गासाठी खूल्या झालेल्या असून त्यापैकी 8 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात येणार आहेत. पालघर पंचायत समितीच्या 9 पैकी 5 जागा, डहाणू पंचायत समितीच्या 2 जागांपैकी 1 जागा, वसई पंचायत समितीच्या 2 जागांपैकी 1 जागा व वाडा पंचायत समितीची 1 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित होतील व उर्वरीत जागा सर्वसाधारण वर्गासाठी खूल्या होतील.

जिल्हा परिषदांच्या सदस्यांची आरक्षण सोडत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली, तर पंचायत समिती सदस्यांच्या आरक्षणाची सोडत संबंधित तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

नव्या आरक्षण सोडतीमुळे अनिश्चितता: इतर मागास प्रवर्गाच्या रिक्त झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या जागा सर्वसाधारण होताना आधीच्या महिला आरक्षित जागा यापुढे आरक्षित रहातील असा अंदाज होता. मात्र नव्याने महिला आरक्षण सोडत काढली जाणार असल्यामुळे सदस्यत्व रद्द झालेल्या पुरुष उमेदवारांसाठी अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यांचा मतदारसंघ आरक्षित झाल्यास निवडणूकीस मुकावे लागेल अथवा मतदारसंघ बदलावा लागणार आहे.