- नविन सीईटीपी केंद्र सुरु करण्यास 20 मार्चपर्यंत मुदत
- उद्योगमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात तातडीची बैठक संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 10 : तारापूर औद्योगिक वसाहतीच्या जुन्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रा (सीईटीपी) कडून प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे होत असलेले उल्लंघन व त्यामुळे या केंद्रावर करण्यात आलेली बंदीची कारवाई तसेच नविन 50 एमएलडी क्षमतेचे सीईटीपी केंद्र कार्यान्वित करण्यात होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभुमीवर सामेवारी (दि. 9) उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मंत्रालयात तातडीची बैठक बोलावली होती. यावेळी जुन्या सीईटीपी केंद्रवरील बंदीची कारवाई स्थगित करतानाच नवीन सीईटीपी केंद्र येत्या 20 मार्चपर्यंत सुरू करा, असे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत. त्यामुळे येथील उद्योजकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

तारापूर एमआयडीसीच्या सालवड येथील 25 दशलक्ष लिटर क्षमतेच्या सामुहिक सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये आवश्यक दर्जा राखला जात नसल्याने तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांचे उल्लंघन होत असल्याने महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाने गेल्या 6 मार्च रोजी हे सीईटीपी केंद्र बंद करण्याचे आदेश दिले होते. हे प्रक्रिया केंद्र बंद झाले असते तर सुमारे 600 उद्योगांना फटका बसला असता तसेच लाखो कामगारांवर बेरोजगाराचे संकट ओढवण्याची शक्यता होती. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन उद्योगमंत्री देसाई यांनी सोमवारी मंत्रालयात या विषयी तातडीची बैठक बोलाविली होती. यावेळी त्यांनी नवीन सीईटीपी केंद्र येत्या 20 मार्च 2020 पर्यंत सुरू करण्याचे निर्देश संबंधितांना दिले. तसेच उद्योजकांनी विहित मुदतीत सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू करण्यास हयगय केल्यास कठोर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी अधिकार्यांना दिले. तर उद्योमंत्र्यांच्या निर्देशानुसार 20 मार्चपर्यंत नविन 50 दशलक्ष लिटर क्षमतेचे सीईटीपी केंद्र कार्यान्वित करण्याचे उद्योजकांनीही यावेळी मान्य केले.