शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त करणाऱ्या प्रकल्पांविरोधात संघर्ष करू – शरद पवार बुलेट ट्रेनसह अन्य प्रकल्पांना विरोध, सरकारच्या धोरणांवर टीका

0
2132
IMG20180324172607विशेष प्रतिनिधी
पालघर, दि. २५ : केंद्र सरकार बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प कोणासाठी राबवतेय. त्या बुलेट ट्रेनमध्ये नेमके बसणार आहे कोण? असा सवाल करत पालघर जिल्ह्यात विविध प्रकल्पांकरिता शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कथित स्वप्न  दाखवणारे हे प्रकल्प एकाच जिल्ह्यातून का नेले जात आहेत. येथील शेतकऱ्यांना उध्वस्त करून कथित विकास करू पाहणार असतील तर त्याविरोधात आपण संघर्ष करू असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी येथील जाहीर सभेत केंद्र सरकारला दिला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका केली. 
        पवार हे शनिवारी ( दि. २४ ) पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यात त्यांनी डहाणू तालुक्यातील विविध उद्योगपती, व्यावसायिक सामाजिक कार्यकर्त्यांसह नागरिकांशी संवाद साधून येथील प्रश्न जाणून घेतले. त्यानंतर सायंकाळी  पालघर येथे आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. त्यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री गणेश नाईक, आमदार जितेंद्र आव्हाड, महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, आमदार आनंद ठाकूर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेखा पष्टे, युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष मिलिंद देशमुख आदी उपस्थित होते.
       यावेळी अधिक मार्गदर्शन करताना पवार म्हणाले की, या जिल्ह्यातून बुलेट ट्रेन, दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, एक्सप्रेस वे, सागरी महामार्ग यासारखे प्रकल्प जात आहेत. एकाच जिल्ह्यातून एव्हढे प्रकल्प नेण्याचे कारण काय? ह्या प्रकल्पांकरिता केव्हढी जमीन लागणार आहे.  म्हणजे इथल्या शेतकऱ्यांचे संसारच सरकारला उध्वस्त करायचे आहेत काय? असा सवाल करत आपली भूमिका विकासाच्या विरोधात कधीही नाही. मात्र शेतकऱ्यांना उध्वस्त करून होणाऱ्या कथित विकासाला आपला विरोध असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली. मोदींनी २०१४ च्या निवडणूकीत वारेमाप आश्वासने दिली. आपण  चमत्कार करून जनतेचे प्रश्न चुटकीसरशी सोडवू, सीमेवर जवान शहीद झाल्यावर खलिते काय पाठवता असा कॉंग्रेस सरकारला सवाल करून आपण सत्तेवर आलो तर एकाच्या बदल्यात दहा मुंडकी आणण्याची भाषा मोदी करत होते. त्यामुळे देशातील जनतेला हा माणूस काहीतरी करेल असे वाटले. म्हणून त्यांच्या हाती सत्ता सोपवली. परंतु आज सीमेवर काय स्थिती आहे? रोज जवान शहीद होत आहेत. अशावेळी मोदी काय करतात हे जनता पाहत आहे. परदेशातील काळा पैसा आणून जनतेच्या खात्यात १५ लाख रुपये टाकणार होते. मात्र नोटबंदी करून जनतेच्याच खिशातून त्यांनी पैसे काढले असे ते म्हणाले. बेरोजगारीच्या बाबतीत दरवर्षी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याच्या  दिलेल्या  आश्वासनाचे काय झाले. नोटबंदीने अनेक व्यवसाय धोक्यात आल्याने मोठ्याप्रमाणावर कामगार कपात झाली. अनेक उद्योगधंदे बंद पडल्याने बेरोजगारीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे  मोदी  जनतेला दाखवलेल्या अपेक्षांची पूर्तता करू शकत नाहीत हे जनतेच्या आता लक्षात आले आहे. म्हणून जनतेचे मत बदलत आहे, हे उत्तर प्रदेशातील पोटनिवडणुकीतील निकालाने दाखवून दिल्याचे पवार म्हणाले. मोदी हे पंतप्रधान म्हणून देशाचा विचार न करता केवळ गुजरातचा विचार करतात. त्यामुळे सगळ्याच गोष्टी त्यांना गुजरातेत हव्यात. अगदी परदेशी पाहुणेही फक्त गुजरातलाच नेल्याने ते  देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे असा प्रश्न निर्माण होतोय, अशी बोचरी टीका त्यांनी मोदींवर केली.
        केंद्रातलं भाजप सरकार हे शेतकऱ्यांच्या व गरिबांच्या विरोधातील असल्याने नोटबंदीदरम्यान जिल्हा सहकारी बॅंकांमध्ये जमा झालेल्या पैशाबाबत विरोधात भूमिका घेतं. जिल्हा सहकारी बॅंकांच्यात काय अंबानी, अदानींचा पैसा आहे? असा सवाल करत हे सरकार  म्हणतेय नोटबंदीच्या काळात जमा झालेल्या नोटांची विल्हेवाट बॅंकांनीच लावावी असे सांगून तो पैसा तोटा दाखवायला म्हणतं. हे धोरण शेतकऱ्यांची बॅंक बुडायला कारणीभूत ठरणारे असल्याने भाजप सरकारला शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णयच करायचेच  नाहीत असे म्हणत भाजप सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरल्याने  येत्या निवडणूकांमध्ये जनता त्यांना धडा शिकवेल. मात्र त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जनतेत जावून लोकांच्या आशा – आकांक्षा , त्यांचे प्रश्न समजून घेत जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करण्याचे आवाहन पवारांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. या मेळाव्याला जिल्हाभरातून हजरो कार्यकर्ते उपस्थित होते. मेळाव्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या  माध्यमातून पालघर शहरात करण्यात आलेल्या विकासकामांचे खासदार शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.