लोकांचे श्रद्धास्थानी असलेले वडाचे झाड मोठ्या पोलिसबंदोबस्तात जमीनदोस्त

0
4630

डहाणू दि. 26: लोकांचे श्रद्धास्थानी असलेले वडाचे झाड आज मोठ्या पोलिसबंदोबस्तात जमीनदोस्त करण्यात आले. डहाणू तालुक्यातील कोसबाडकडे जाणाऱ्या रस्त्यावरील वाकी मुसळपाडा हद्दीतील हे वडाचे जुने झाड इंडस्ट्रीयल कॉरिडॉर ह्या खाजगीकरणातून उभारल्या जाणाऱ्या लोहमार्गाच्या आड येत होते. ह्या झाडाच्या खोडात श्री गणेशाची प्रतिकृती दिसत असल्याने परिसरातील लोकांचे ते श्रद्धास्थान ठरले होते. दरवर्षी ह्या झाडाच्या खाली दिड दिवासांच्या गणपतीची स्थापना करण्यात येत असे. इंग्रज राजवटीत ह्या झाडाखाली न्यायनिवाडे होत असल्याचे म्हटले जाते. लोकांचा हे झाड कापण्यास तीव्र विरोध होता. अखेर मोठ्या पोलिस बंदोबस्तात आज ह्या झाडाला जमीनदोस्त करण्यात आले. ह्या गणेशाचे नियमित दर्शन घेणारे भाविक व श्री साईबाबा ट्रस्ट (नरपड) चे अध्यक्ष सुधाकर राऊत यांनी झाड कापण्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हे झाड कापण्याऐवजी त्याचे स्थालांतरण करणे उचित ठरले असते. हवे तर आम्ही भाविकांनी खर्च केला असता, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे.