बोईसरचा नवा रस्ता ठरतोय धोकादायक; साईडपट्टी नसल्याने होताहेत अपघात

0
3297

बोईसर, दि. 5 : बोईसर शहरातील मुख्य व अत्यंत रहदारीचा समजल्या जाणार्‍या बोईसर बस स्थानक ते चित्रालय रस्त्याचे सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून काँक्रिटीकरण तसेच रुंदीकरणाचे काम सुरु आहे. यापैकी बोईसर बस स्थानक ते भीमनगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आल्याने, या रस्त्याची मध्यभागी उंची वाढून साईडपट्टी नाहीशी झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा सुमारे 1 फूट खोलगट भाग तयार झाला आहे. परिणामी या रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनचालकांचा अंदाज चुकून दिवसाआड येथे अपघात होत आहेत. त्यातच आता पावसाळा सुरु झाल्याने हा रस्ता अधिकच धोकादायक बनला असुन अपघात वाढण्याची अधिक शक्यता निर्माण झाली आहे.

काल ४ जुलै रोजी ओसवाल एंपायर समोर घडलेला अपघात

मागील अनेक वर्षांपासुन ज्या रस्त्याच्या दुरुस्ती व रुंदीकरणाची बोईसरकर मागणी करत होते, त्या बोईसर रेल्वे स्टेशन ते चित्रालय या मुख्य रस्त्याचे सध्या काम सुरु आहे. या रस्त्यावरील रेल्वे स्टेशन ते बस स्थानकापर्यंतच्या रस्त्याचे यापुर्वीच काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर लॉकडाऊनच्या काळात तेथून पुढच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. आजच्या घडीला भीमनगरपर्यंत काँक्रिटीकरण तसेच तेथून पुढे बीएआरसी कॉलनीपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण पुर्ण झाले आहे. तर पुढील रस्त्याचे काम अद्याप अपुर्ण आहे.

एकीकडे बस स्थानक ते भीमनगरपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्यामुळे यापुढील अनेक वर्षे बोईसरकरांची खड्डेमय रस्त्यापासुन सुटका होणार आहे. तर दुसरीकडे हा नवा रस्ताच अनेक वाहनचालकांना सध्यातरी डोकेदुखी ठरताना दिसत आहे. या रस्त्याचे काँक्रिटीकरण झाल्याने रस्त्याची मध्यभागी उंची वाढून साईडपट्टी नाहीसी झाली आहे. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा 10 ते 12 इंचापर्यंत खोलगट भाग तयार झाला आहे. परिणामी वाहनचालकांचा अंदाज चूकत असल्याने अनेक छोटी-मोठी वाहने रस्त्याच्या खाली उतरुन रुतून बसल्याच्या घटना घडत आहेत. ही रुतलेली वाहने पुन्हा रस्त्यावर आणताना वाहनचालकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहायला मिळते. काही वाहनांचे अशाप्रकारच्या अपघातामुळे नुकसानही झाले आहे.

  • पावसामुळे अपघातांची शक्यता वाढली
    साईडपट्टी नसल्याने अद्यापर्यंत या रस्त्यावरुन वाहने रस्त्याखाली उतरुन रुतून बसल्याच्याच घटना घडत असल्याचे पहायला मिळत आहे. मात्र आता पावसाने जोर धरल्याने अपघातांची शक्यता अधिक वाढली आहे. काही तास पाऊस कोसळल्यास या खोलगट भागांमध्ये पाणी साचून मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या रस्त्यावर पथदिवे नसल्याने हा धोका अधिकच गंभीर बनला असुन रात्री-अपरात्री या रस्त्यावरुन प्रवास करणे निश्‍चितच धोकादायक ठरणार आहे.

त्यामुळे संबंधितांनी याप्रश्‍नी लक्ष घालून लवकरात लवकर साईडपट्टीचे काम पुर्ण करावे, अशी मागणी बोईसरकरांकडून होत आहे.