पालघर, दि. 5 : एकीकडे कोट्यावधींचे वीजबिल थकले असल्याने अडचणीत आलेल्या महावितरणकडून विविध मार्गाने ग्राहकांना वीजबिल भरण्याचे आवाहन केले जात असताना आज पालघर जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकारवर वीजबिल माफीबाबत घुमजाव केल्याचा आरोप करत पालघरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी आंदोलकांकडून ठाकरे सरकारविरोधात घोषणाबाजी करुन महावितरणच्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. या आंदोलनात पालघर जिल्ह्यातील भाजपाचे अनेक पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, आंदोलन करणार्या पदाधिकार्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.