वाड्यात अनैतिक संबंधातून तरुणाचा खून?

0
2503

वाडा, दि. 7 : पत्नीला अनैतिक संबंधाबाबत शंका आल्यानंतर सासरवाडीतून आपल्या घरी जाण्यासाठी निघालेल्या 27 वर्षीय तरुणाचा एका झोपडीत मृतदेह आढळून आला आहे. डोक्यात अज्ञात वस्तुने प्रहार करुन त्याची हत्या करण्यात आली असुन आरोपीच्या अटकेनंतरच या हत्येमागील कारण स्पष्ट होणार आहे.

करण गोपाळ रेजंड असे मृत तरुणाचे नाव आहे. करण मागील महिन्याभरापासुन त्याच्या वाडा तालुक्यातील उमरोठे येथील 22 वर्षीय पत्नीच्या घरी राहात होता. काही दिवसांपुर्वी त्याच्या पत्नीला करणचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय आल्यानंतर तिने याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. यानंतर करण 5 फेबु्रवारी रोजी रात्री 8 वाजता आपल्या विक्रमगडमधील माले येथील घरी जात असल्याचे सांगत तेथून निघून गेला. दुसर्‍या दिवशी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी करणच्या पत्नीने तो घरी पोहोचला का याबाबत खात्री करण्यासाठी फोन केल्यानंतर तो घरी पोहोचलाच नसल्याचे तिला कळाले. यानंतर त्याच्या पत्नीने त्याचा आजूबाजुच्या परिसरात शोध सुरु केला असता तुंबडेपाडा येथील एका झोपडीत त्याचा मृतदेह आढळून आला.

करणच्या पत्नीने याबाबत पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासात अज्ञात वस्तुने डोक्यात प्रहार करुन करणची हत्या केल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र त्याची हत्या अनैतिक संबंधातून झाली की अन्य कोणत्या कारणावरुन हे तपासाअंतीच समोर येणार आहे.

याप्रकरणी वाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन जव्हारचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत परदेशी याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.