प्रतिनिधी:
कुडूस दि. १९ :परिसरातील दगडखाणी व कारखानदारी या मुळे जंगलांचा नायनाट झाला असला तरी येथील आदिवासी महिलांनी शासनाच्या फसव्या घोषणावर विश्वासून न बसता तेंदू पानावर आपला स्वयं रोजगार शोधला आहे.
कुडूस, केळठण ,लोहोपे, गुंजकाटी या परिसरात काही वर्षांपूर्वी घनदाट जंगल होते. भरपूर वृक्ष, प्राणी व जंगली मेवा यांची वाणवा नव्हती. मात्र काळानुरुप माणूस बदलला, निसर्गात अनेक बदल झाले. कारखाने आले आणि जंगल नाहिसे झाले.पूर्वी शेतकरी जंगलातील पालापाचोळा जमा करून शेतीसाठी वापर करीत असे. जळणासाठी सुकलेले सरपण मिळत असे.जांभळे, करवंदे, कै-या आवळा अशी अनेक फळे आणि पालेभाज्यांची लयलूट असे. या सा-यावर आदिवासी महिलांचा रोजगार चाले.
आज सर्वत्र रानमाळ उजाड बनला आहे. कारखाने, विटभट्टीने खडकांचाही भुगा झाला आहे. माणूस रोजगाराच्या शोधात आहे. अशातच डोंगस्ते विजयगड मधील आदिवासी वस्तीतील महिलांनी सरकारी योजनांच्या भरवश्यावर न राहता स्वतः चा रोजगार शोधला आहे. येथील महिला सकाळी लवकर उठून रानावनात तेंदूची पाने शोधून ती तोडून आणतात व उन्हात सुकवून त्यांच्या पुड्या बांधतात. अशा एका पुडीचे त्यांना तीन रूपये मिळतात. 100 ते 150 पुड्या विकून त्यांना दिवसाकाठी 300 रूपया पर्यत कमाई होते. या वर त्या आपला रोजगार चालवतात. येथील प्रा. धनंजय पष्टे हे सेवाभावी पणे त्यांना मार्गदर्शन करीत आहेत.