डहाणू पोलीसांच्या हस्तक्षेपानंतर एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्स विरोधातील आंदोलन स्थगित

0
2968

राजतंत्र न्युज नेटवर्क/दि. 9 : डहाणू तालुक्यातील आशागड स्थित एसीजी असोसिएटेड कॅप्सुल कंपनीच्या प्रकल्प विस्तारास पेसा अंतर्गत ग्रामसभेने परवानगी नाकारल्यानंतरही बांधकाम चालू ठेवणे अंगलट येत असल्याचे लक्षण आहे. या बेकायदेशीर प्रकल्प विस्ताराकडे शासकीय यंत्रणा डोळेझाक करीत असल्याच्या भावनेतून ग्रामस्थांनी शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी कंपनीच्या प्रवेशद्वारावर निदर्शने करण्याचा इशारा दिला होता. या इशारर्‍यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता डहाणूचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे यांनी कंपनी व्यवस्थापन व स्थानिकांमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी कंपनी व्यवस्थापनातर्फे विधिग्राह्य अशा परवानग्या प्राप्त झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी त्या सादर करु न शकल्याने पोलीसांनी बांधकाम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. बुधवारी (10) उभय पक्षांची पुन्हा बैठक होणार आहे.

याच विषयाशी संबंधित बातमी वाचा ! …. पेसा अंतर्गत ग्रामसभेने ना हरकत पत्र नाकारल्यानंतरही एसीजी असोसिएटेड कॅप्सुल्सचा प्रकल्प विस्तार

प्रदूषण आढळल्यास कंपनी संचालकांविरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता!
पोलीसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला पाण्याचे नमुने तपासण्यासाठी पत्र दिले आहे. बुधवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत हे नमुने गोळा करुन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. त्याचे निष्कर्ष आक्षेपार्ह निघाल्यास थेट कंपनीच्या संचालकांविरोधातच गुन्हे दाखल होण्याचे संकेत मिळत आहेत.

कंपनीने काम थांबवले!
सर्व शासकीय यंत्रणा आमच्या खिशात आहेत अशा भ्रमात वावरणार्‍या व्यवस्थापनाला अखेर परिस्थितीचे भान आले आहे. पोलीसांची नोटीस प्राप्त झाल्यानंतर आता कंपनीने बांधकाम त्वरित बंद केले आहे.