पालघर, 9 जानेवारी : 30 डिसेंबर 2020 रोजीच्या रात्री बोईसरच्या मंगलम ज्वेलर्स या सुवर्णकाराकडे भिंतीला भगदाड पाडून घरफोडी करणार्या आरोपींपैकी 2 आरोपींना झारखंड पोलिसांच्या मदतीने पकडण्यात पालघर पोलिसांना यश आले आहे. बदरुद्दीन कादिर शेख व हासीम फैजुद्दीन शेख (रा. साहिबगंज, झारखंड) अशी सदर आरोपींची नावे आहेत. या चोरट्यांकडून 325 ग्रॅम सोने व 5 लाख 50 हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी कापून त्यातील 14 किलो सोन्याचे दागिने व 60 लाख रुपयांची रोख रक्कम असा एकूण 7 कोटी 60 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला होता. बोईसर पोलीस ठाण्यात याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 454, 457, 380, 34 अन्वये गुन्हा दाखल (क्र. 320/2020) झालेला आहे.
या गुन्ह्याच्या तपासासाठी बोईसर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरिक्षक आशिष पाटील, बोईसर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे व संदिप पाटील, तसेच जिल्हा मुख्यालयातील सहायक पोलीस निरीक्षक गीताराम शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली 4 पथके तयार करण्यात आली होती. ही पोलीस पथके आरोपींच्या लोकेशनचा शोध घेत झारखंड राज्यातील राजमहल तालुक्यातील (जिल्हा साहिबगंज) राधानगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोहोचले व स्थानिक उप विभागीय पोलीस अधिकार्यांच्या नेतृत्वाखालील पथकांच्या सहाय्याने बदरुद्दीन शेख व हासीम शेख या दोघांना जेरबंद केले.
दरम्यान, या आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार 4 अन्य आरोपींची पूर्ण नावे व पत्ता पोलिसांना मिळाला असून अतिरिक्त 3 नावे निष्पन्न झालेली आहेत. मात्र या अतिरिक्त 3 आरोपींचे पूर्ण नाव व पत्ता निष्पन्न होणे बाकी आहे. नेपाळी सुरक्षा रक्षकासह 4/5 नेपाळी नागरिकांचा देखील गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी 6 पथके झारखंड व पश्चिम बंगालमध्ये रवाना झाली आहेत.
