पालघर, दि. 8 : पालघर जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठीच्या हालचालींनी वेग धरला असून या लसीकरणासाठीची रंगीत तालीम (ड्राय रन) आज, शुक्रवारी मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणार्या मासवण आश्रमशाळेत जिल्हा परिषद उपाध्यक्ष निलेश सांबरे, जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ व मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या विशेष देखरेखीखाली पार पडली.
लसीकरणसंदर्भात आवश्यक असलेल्या बाबींची पूर्वतयारी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या नियमांचे पालन करून ही ड्राय रन घेतली गेली. यावेळी प्रत्यक्षात लस टोचली नसली तरी लस टोचण्यासाठी झालेल्या पूर्वतयारीची पाहणी यावेळी उपस्थित अधिकार्यांनी केली. जिल्ह्यातील एकूण 16 हजार आरोग्य कर्मचार्यांना पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यासाठी ही ड्राय रन आयोजित करण्यात आली असून कुठलीही भीती न बाळगता ही लस घ्यायची आहे. लस घेते वेळी एखाद्या व्यक्तीस त्रास झाल्यास तेथेच त्याच्यावर औषधोपचार करण्यात येतील, तसेच लस घेणार्या व्यक्तीने लसीकरण केंद्रावर नोंदणी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे सोबत घेऊन जावीत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. गुरसळ यांनी देऊन ही रंगीत तालीम म्हणजे आरोग्य कर्मचार्यांचे प्रशिक्षण आहे, असे मत व्यक्त केले.

जिल्ह्याला ही लस प्राप्त होताच पहिल्या टप्प्यात आशा कार्यकर्त्या, आरोग्य व ग्रामीण रुग्णालयांचे 11 हजार 913 कर्मचारी तसेच खाजगी, शहरी व ग्रामीण भागातील 5 हजार 498 आरोग्य कर्मचार्यांना ही लस देण्यात येईल. दुसर्या टप्प्यात पोलीस, 50 वर्षावरील सर्व नागरिक व 50 वर्षांखालील रक्तदाब, मधुमेह, कर्करोग अशा रुग्णांना लस देण्यात येईल, अशी माहिती देखील यावेळी देण्यात आली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दयानंद सूर्यवंशी यांनी लसीकरण मोहिमेत समाविष्ट असलेल्या सर्व अधिकारी व कर्मचार्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्या अनुश्री पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक अनिल थोरात, अति. जिल्हा आरोग्य आधिकारी डॉ. मिलिंद चव्हाण, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सागर पाटील, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे, आयुष अधिकारी डॉ. तन्वीर शेख, डॉ. महेश बडगुजर व इतर आरोग्य अधिकारी-कर्मचारी, आशा व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
