पालघर, दि. 21 : मागील काही दिवसांपासुन राज्यभरासह पालघर जिल्ह्यात करोनाचे रुग्ण वाढत असल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे प्रशासन सतर्क झाले असुन शासनाने घालून दिलेल्या करोना नियमांचे पालन न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. पालघर जिल्हाधिकार्यांनी देखील नियमांचे पालन न करणार्या नागरीकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले असुन आतापर्यंत 190 हून अधिक जणांवर जिल्ह्यातील विविध भागात कारवाई करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासुन पालघर जिल्ह्यातील दररोज करोना रुग्ण आढळून येण्याची संख्या एक अंकी असतानाच 19 फेबु्रवारी रोजी पालघर तालुक्यात 10, डहाणू तालुक्यात 1 व तलासरी तालुक्यात 1 असे 12 रुग्ण आढळून आले. तर त्यापुर्वी 18 फेबु्रवारी रोजी डहाणूत 11, पालघरमध्ये 3 व विक्रमगडमध्ये 1 असे 15 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे करोनाचा वाढता संसर्ग आणि रुग्णांची वाढती संख्या विचाराता घेता जिल्ह्यात सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक व मुख्याधिकारी यांच्यामार्फत सार्वजनिक ठिकाणी भेटी देऊन करोना नियमांचा भंग होणार्या सार्वजनिक ठिकाणांवर कारवाया करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष डॉ. माणिक गुरसळ यांनी दिले आहेत.
त्यानुसार जिल्ह्यामध्ये गेल्या दोन दिवसांत 66 सार्वजनिक ठिकाणी तपासण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दुकानदार, रिक्षाचालकांसह विनामास्क असलेल्या 189 हून अधिक लोकांवरती कारवाया करुन 42 हजार 750 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. दरम्यान, नागरीकांनी करोना नियमांचे पालन करावे आणि करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्यांनी केले आहे.