ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांची इंडियन लॉ सोसायटीच्या उपाध्यक्षपदी निवड

0
2053

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 21 : ज्येष्ठ विधिज्ञ व शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी प्रकाश वासुदेव करंदीकर यांची पूणे येथील इंडियन लॉ सोसायटी (आयएलएस, पूणे) या स्वातंत्र्यपूर्व काळापासून विधीक्षेत्रात अनमोल योगदान देणार्‍या सुप्रसिद्ध संस्थेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती मृदुला भाटकर या संस्थेच्या अध्यक्षपदावर निवडल्या गेल्या आहेत.

प्रकाश करंदीकर यांनी इंडियन लॉ कॉलेजमधून 1964 ते 1966 दरम्यान एल.एल.बी.चे शिक्षण फर्स्ट क्लास फर्स्ट श्रेणीत पूर्ण करुन सुवर्णपदक पटकावले होते. त्यानंतर येथील वसतीगृहात राहूनच त्यांनी एल.एल.एम.चे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. शिष्यवृत्तीद्वारे परदेशात उच्च शिक्षण घेण्याची संधी न स्वीकारता श्री करंदीकर यांनी ठाणे व पालघर या आदिवासी व ग्रामीण जिल्ह्यामधून वकिली सुरु केली. त्यांनी 1973 ते 1983 च्या दरम्यान पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात कायदा विषय शिकविण्याची जबाबदारी पार पाडलेली आहे. 2005 मध्ये त्यांना आयएलएसचे सदस्यत्व देण्यात आले व 2010 पासून ते संस्थेच्या संचालन समितीचे सदस्य होते. आता ते उपाध्यक्ष झाले आहेत. श्री करंदीकर हे नूतन बाल शिक्षण केंद्र (विकासवाडी – कोसबाड हिल) व डहाणू एज्युकेशन ट्रस्टचे विश्वस्त आहेत. त्यांनी पद्मश्री अनुताई वाघ यांच्या सोबत काम केलेले आहे.

इंडियन लॉ सोसायटी विषयी थोडक्यात माहिती : ही संस्था 1924 मध्ये स्थापन झाली असून संस्थेच्या विधी महाविद्यालयाने आजपर्यंत अनेक ख्यातनाम व्यक्तीमत्वे दिली आहेत. त्यामध्ये भारताचे 7 वे सरन्यायाधीश पी. बी. गजेंद्रगडकर, 16 वे सरन्यायाधीश वाय. व्ही. चंद्रचूड व 19 वे सरन्यायाधीश इ. एस. वेंकटरामी यांचा समावेश आहे. मुंबई व महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, दिवंगत माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, पद्मविभूषण मोहन धारिया आयएलएसचे विद्यार्थी होते.