सोशल मिडियावरील कोरोना टेस्टच्या मॅसेजमुळे कमलेश मंत्रीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
7086

डहाणू तालुक्यातील चिंचणी येथील कमलेश जगदीश मंत्री याच्यावर सोशल मिडियावरुन चुकीचा संदेश पसरविण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कमलेश हा कोरोनाबाधीताच्या संपर्कात आल्यामुळे चाचणीसाठी त्याचा ‘ स्वॅब ‘ घेण्यात आला. नमुना जे. जे. रुग्णालयात (मुंबई) तपासणीसाठी पाठविण्यात आला असता अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला. ह्यामुळे आरोग्यविभागाने त्यास कोव्हीड केअर सेन्टर मध्ये जाण्याचा सल्ला दिला. हा सल्ला न मानता कमलेशने खासगी लॅबोरेटरी मधून तपासणी करुन घेतली असता अहवाल निगेटिव्ह आला. त्यानंतर संबंधित आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून सोशल मिडियाद्वारे आरोग्य यंत्रणेविषयी अविश्वास दर्शविणारा मॅसेज प्रसारीत केला.

कमलेशचा मॅसेज व्हायरल झाल्यानंतर लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला व काहींनी शासनास सहकार्य करण्यास नकार दिला. चिंचणी येथील अन्य 4 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांनी देखील कोव्हीड केअर सेन्टर मध्ये जाण्यास नकार दिला आणि तहसिलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, पोलिस अधिकारी यांचेशी हुज्जत घातली. याबाबत चिंचणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी यांनी तहसिलदारांकडे तक्रार केल्यानंतर वाणगांव पोलिस स्टेशनमध्ये 1. कमलेश जगदीश मंत्री 2. निलेश पंढरीनाथ दवणे 3. गुलाम इस्माईल शेख 4. इरफान अस्लम शेख व 5. रफिक इनायत खान यांचेविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 चे कलम 2 व 3, आपत्ती व्यवस्थापन 2005 मधील कलम 51(b) अन्वये गुन्हा दाखल (क्र. 48/2020) करण्यात आला आहे. (दिनांक 24.07.2020)