डहाणूत महायुतीची प्रचारसभा

0
2213

प्रतिनिधी/डहाणू, दि. 22 : आगामी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी हळूहळू सुरुवात केली आहे. काल रविवारी, संध्याकाळी महायुतीतर्फे विविध ठिकाणी 4 प्रचार सभा घेण्यात आल्या. त्यापैकीच एक सभा डहाणूतील पटेल पाडा येथे रात्री 10 वाजता घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष भरत राजपूत, भाजपाचे तालुका अध्यक्ष तथा नगरसेवक भरत शाह, रमेश काकड, व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेश ठाकूर तसेच इतर आजी-माजी नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.

या प्रसंगी बोलताना उप नगराध्यक्ष रोहींटन झाईवाला यांनी मोदी सरकारने मागील 5 वर्षात केलेल्या विविध विकासकामांचा आढावा घेतानाच काँग्रेसच्या 60 वर्षाच्या कालावधीतील कामगिरीवर सडकून टीका केली. पंतप्रधान मोदींच्या अथक प्रयत्नामुळे राजकीय दृष्ट्या आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाला आज मानाचे स्थान आहे, असे सांगून शेवटी महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावीत यांना धनुष्य बाणासमोरील बटण दाबून मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सामाजिक कार्यकर्ते रोटरीयन फैयाज शेख यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना, केंद्र सरकारने लाखो गरीब नागरीकांची बँक खाती उघडून विविध शासकीय योजनांचा आर्थिक लाभ बँक खात्यात जमा केला. मोदी पंतप्रधान झाल्यावर अल्प संख्यकांना विशेषतः मुसलमानांना त्रास होईल, अशी भीती समाजात पसरवली गेली. मात्र आपण मागील 5 वर्षाचा कालावधी बघितल्यास तसे काहीच घडलेच नसल्याचे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, असे शेख म्हणाले. तर नगराध्यक्ष भरत राजपूत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना डहाणू नगर परिषदेच्या मागील दीड वर्षातील विविध विकास कामांचा पाढा वाचून नगर परिषदेवर यापुर्वी सत्तवेर असलेल्या राष्ट्रवादीच्या कामगिरीवर टीका केली. डहाणूतील विविध विकास कामांसाठी राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला आहे. त्यासाठी केंद्रात व राज्यात महायुतीचे सरकार असणे आवश्यक आहे, असे सांगून महायुतीच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे, यावरही त्यांनी विशेष भर दिला. सभेला परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी चंद्रेश जोशी यांनी उपस्थितांचे आभार मानले.