पोक्तपणाचे सल्ले देऊन मुलांचे बालपण हिरावून घेऊ नये! -न्या. सत्यरंजन धर्माधिकारी

0
3506

राजतंत्र न्यूज नेटवर्क/ठाणे, दि. 22 : आपले वय झाल्यानंतर बालपण गमावलेले असते. आपण पोक्त झालेलो असतो. परंतु लहान मुलांना पोक्तपणाचे सल्ले देण्याचा बालिशपणा टाळून त्यांना बालपणाचा आनंद अनुभवू दिला पाहिजे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी ठाणे येथे बोलताना केले. ते नूतन बाल शिक्षण संघाच्या पद्मभूषण ताराबाई मोडक विशेष संस्था व पद्मश्री अनुताई वाघ विशेष व्यक्ती पुरस्कार वितरण कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. चार भिंतींमध्ये माणूस साक्षर होत असेल, मात्र शिक्षित होण्याची प्रक्रिया निरंतर चालू असते. या प्रक्रियेत अडथळा न ठरता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते वातावरण जोपासले पाहिजे, असे विचार न्या. धर्माधिकारी यांनी यावेळी मांडले. ताराबाईंना बरा न होऊ शकणारा बालरोग जडला होता आणि तो त्यांनी शेवटपर्यंत जोपासला असे सांगून डॉ. सुचित्रा नाईक यांनी ताराबाई आणि अनुताई यांचा जीवनपट उलगडून मांडला. ताराबाईना पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यापेक्षाही मुलांमध्ये रमणे प्रिय होते, असेही डॉ. सुचित्रा म्हणाल्या.

हेही वाचा :
भारतातील पहिल्या बालशिक्षणतज्ज्ञ पद्मभूषण ताराबाई मोडक यांना आदरांजली

पद्मभूषण ताराhताई मोडक आणि पद्मश्री अनुताई वाघ पुरस्कार जाही

2019 च्या पद्मभूषण ताराताई मोडक विशेष संस्था पुरकारासाठी आनंद निकेतन (नाशिक) या संस्थेची आणि पद्मश्री अनुताई वाघ विशेष व्यक्ती पुरस्कारासाठी श्रीमती सुचिता सोळंके (कारंजा-वाशिम) यांची निवड करण्यात आली होती. आनंदनिकेतन तर्फे श्रीमती दिपा पळशीकर यांनी पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पुरस्करांचे वितरण करण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी व जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या (ठाणे) प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे विश्वस्त ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर, अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर, निवड समितीचे सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर व प्रिंसिपल अनंत गोसावी, श्रीमती सुचिता सोळंके, आनंद निकेतन (नाशिक) च्या दिपा पळशीकर उपस्थित होते.

विजय कुवळेकर यांनी पुरस्कार्थी निवड करण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती दिली. तर अध्यक्ष चंद्रगुप्त पावसकर यांनी संस्थेच्या कार्याचा उपस्थितांना परिचय करुन दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन केलेल्या नूतन बाल शिक्षण संघ या संस्थेच्या माध्यमातून पूर्व प्राथमिक शिक्षणाचा पाया रचणार्‍या देशाच्या बालशिक्षणतज्ञ पद्मभूषण ताराताई मोडक व त्यांना सावलीची साथ देणार्‍या समाजसेविका पद्मश्री अनुताई वाघ यांच्या स्मरणार्थ नूतन बाल शिक्षण संघातर्फे ताराताईंच्या स्मरणार्थ एक संस्था व अनुताईंच्या स्मरणार्थ एक व्यक्ती यांना प्रत्येकी 25 हजार रूपये आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येते. दरवर्षी ताराताईंच्या जयंती दिनी 19 एप्रिल रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.