दि. 20 : केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाने 20 जून 1991 रोजी डहाणू तालुक्याला पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील घोषित करणारी अधिसूचना काढून उद्योगबंदी लादलेली आहे. यामुळे तालुक्याचा विकास खुंटलेला असल्याची भावना निर्माण होत असून 20 जून हा काळा दिवस मानला जातो. एकीकडे तालुक्यावर बंधने लादली असताना इंडस्ट्रियल कॉरीडोर, वाढवण बंदर, विविध महामार्ग असे प्रकल्पही येऊ घातले आहेत. यातून विविध प्रकारे संभ्रम निर्माण होत आहे. याबाबत लोकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतूने दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी यांच्या पुढाकाराने 91 ची अधिसूचना ही शाप की वरदान? या विषयावर रोटरी सभागृह येथे चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात दि डहाणूरोड जनता बँकेचे चेअरमन राजेश पारेख, माजी नगराध्यक्ष मिहीर शहा, रविंद्र फाटक, नंदादीप कोकणे, मिनू इराणी, सुधीर कामत, कुमार नागशेट, मंचेर मुबारकी, विपूल गाला यांसह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होती. यावेळी उपस्थितांनी आपापले विचार व्यक्त केले.