
वार्ताहर/बोईसर, दि. 23 : पालघर नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या उत्तम घरत यांची बिनविरोध निवड झाली आहे. पालघर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष व 28 नगरसेवक पदासाठी नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेचे 15, भाजपाचे 5, राष्ट्रवादीचे 3 व 5 अपक्ष उमेदवार नगरसेवक म्हणून तर राष्ट्रवादीच्या डॉ. उज्वला काळे थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या आहेत. दरम्यान शिवसेनेच्या 4 अपक्ष बंडखोर नगरसेवकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने नगरपरिषदेत शिवसेना-भाजप युतीच्या नगरसेवकांची संख्या 24 झाली आहे. आज नगरपरिषदेच्या उप नगराध्यक्ष पदासाठी पार पडलेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उत्तम घरत व भाजपच्या लक्ष्मीदेवी हजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र लक्ष्मीदेवी हजारी यांनी अर्ज मागे घेतल्याने उत्तम घरत बिनविरोध निवडून आले.
