खुनाचा गुन्हा 4 तासात केला उघड; जव्हार पोलिसांची कामगिरी

0
3327
प्रतिकात्मक छायाचित्र

जव्हार, दि. 7 : मागील आठवड्याभरापासुन बेपत्ता असलेल्या 38 वर्षीय इसमाचा खून केलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानंतर अवघ्या 4 तासात याप्रकरणातील आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी जव्हार पोलिसांनी केली आहे. देवराम रावजी नाकरे (वय 38) असे खून झालेल्या इसमाचे नाव असुन याप्रकरणी तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हारमधील आळीवमाळ (पो. साकुर) येथील रहिवासी देवराम नाकरे हे 31 मे पासुन बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने 5 जून रोजी जव्हार पोलिसांत केली होती. पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच दुसर्‍या दिवशी हेदोलीपाडा येथील जंगलात एका गोणीमध्ये काहीतरी संशयित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याची खातरजमा रण्याकरीता पोलीस निरीक्षक अप्पासाहेब लेंगरे, पोलीस उपनिरिक्षक सागर पाटील व पुनम सुर्यवंशी आपल्या पथकासह झाप गावच्या हद्दीतील हेदोलीपाडा जंगलात गेले. यावेळी जंगलात साधारण 50 फुट खोल दरीत एका झाडाच्या बुंध्याखाली असलेल्या खोलगट भागात प्लॉस्टीकच्या गोणीमध्ये मृतदेह आढळून आला. मृतदेह कुणासही दिसु नये म्हणून आरोपींनी त्याच्यावर मोठ्या दगडांचा ढीग करुन ठेवला होता. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने दगडांचा ढीग हटवल्यानंतर सदर मृतदेह देवराम नाकरे यांचा असल्याचे स्पष्ट झाले. जव्हार पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर आपणच हा खून केल्याची कबूली त्यांनी दिली.

यानंतर तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली असुन त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 302,201 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघांनाही न्यायालयापुढे हजर केले असता 11 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, या खूनामागचे कारण अद्याप समोर आले नसुन जव्हार पोलीस अधिक तपास करीत आहेत.