खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते उद्घाटन

वार्ताहर/बोईसर, दि. 13 : आदिवासींच्या निसर्ग पूजक परंपरा, भाषा व कला संस्कृतीच्या संवर्धनासाठी तसेच या जनसमूहाचे अस्तित्व टिकवणे व त्यांच्या न्याय हक्कांबाबत जनजागृती करून मानवमुक्ती व प्रकृती या दोन मुद्द्यांवर समाजाला भेडसावणार्या विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आदिवासी एकता परिषदेतर्फे पालघर येथे तीन दिवसीय महा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते आज, सोमवारी या संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. संमेलनासाठी देशातील विविध भागातून आलेले हजाराहून अधिक आदिवासी बांधव 13, 14 व 15 जानेवारी असे तीन दिवस पालघर येथे ठाण मांडून असणार आहेत.

आदिवासी हे खरे मूळ निवासी असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेही मान्य केले असताना देशातील आदिवासींच्या अस्तित्वावर हल्ले होत आहेत. आदिवासींच्या जल, जंगल व जमीन यावरील अधिकार नाकारले जात असून पाचव्या व सहाव्या अनुसूची अंतर्गत तसेच पेसा कायद्याने दिलेल्या ग्रामसभेचे अधिकार अशा संविधानात्मक तरतुदींचे उल्लंघन होत असल्याचे आरोप आदिवासी समुदायाकडून होत आहेत. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी विकासाच्या नावाखाली डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर, बुलेट ट्रेन प्रकल्प, मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्ग, वाढवण बंदर, सागरी महामार्ग इत्यादी प्रकल्पांच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना हद्दपार केले जात असल्याची आदिवासी बांधवांची भावना आहे. अशाप्रकारे संपूर्ण देशात विकासाच्या नावाने राबवल्या जाणार्या विनाश नीतीच्या विरोधात आदिवासी एकता परिषदतर्फे संघर्ष करण्यात येत असून या महा संमेलनाच्या निमित्ताने 14 व 15 जानेवारी याबाबत चर्चा करण्यात येणार असल्याचे परिषदतर्फे सांगण्यात आले.

या महा संमेलनात आदिवासी जीवन शैली, पारंपारिक अवजारे, खाद्यपदार्थ व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शन देखील आयोजित करण्यात येणार असून ’आदिवासीत्व’ हा केंद्रबिंदू म्हणून या सांस्कृतिक महा संमेलनाचे आयोजन केले गेले असल्याचे आदिवासी एकता परिषदेचे काळूराम धोदडे यांनी सांगितले. या संमेलनानिमित्त उद्या, 14 जानेवारी रोजी पालघर येथे सांस्कृतिक रॅलीचे आयोजन करण्यात येणार असून यामध्ये तारपा, ढोल नाच तसेच देशभरातील आदिवासी जन समूहाच्या कला, संस्कृतीचे दर्शन या मिरवणुकीत उद्या दिसणार असल्याचे ते म्हणाले.
तीन दिवस सुरु राहणार्या या आदिवासी समाजाच्या सांस्कृतिक महा संमेलनात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होणार आहे. संमेलनाच्या ठिकाणी आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणारे देखावे उभारण्यात आले असून देशातील विविध भागातील आदिवासी बांधव यावेळी पारंपारिक नृत्य व इतर कला सादर करणार आहेत. 14 जानेवारी रोजीच्या सांस्कृतिक रॅलीत छत्तीसगडच्या राज्यपाल अनुसुइया उइके, उनो समितीच्या उपाध्यक्ष फुलमन चौधरी, राज्याचे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
