
राजतंत्र न्यूज नेटवर्क/डहाणू दि. ८: ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थांना उपस्थित रहाण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिला आहे. चिंचणीचे ग्रामस्थ निलेश केसरीनाथ बाबरे यांनी याबाबत हक्क मिळविण्यासाठी पाठपुरावा केल्यानंतर हा खुलासा झाला आहे.
निलेश बाबरे यांनी चिंचणी ग्रामपंचायतीकडे मासिक सभेला उपस्थित रहाण्याची परवानगी मागितली होती. मात्र चिंचणी ग्रामपंचायतीने निलेश यांना मासिक सभेस उपस्थित रहाण्यास अनुमती दिली नाही. यावर निलेश यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांचेशी पत्रव्यवहार केला असता त्यांनी जिल्हा परिषदेचे मार्गदर्शन मागितले. पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ मिलिंद बोरीकर यांनी दिनांक १६ एप्रिल २०१९ च्या, जावक क्र. ३२४ च्या पत्रान्वये ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना ग्रामस्थांना उपस्थित रहाण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिला आहे. पंचायत समितीची सभा सर्वसाधारण लोकांसाठी खुली असून याबाबत अधिकाधिक जनजागृती करुन लोकांना प्रोत्साहीत करावे अशी शासनाची भूमिका असल्याचे देखील या पत्राद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे.
