
वार्ताहर/बोईसर, दि. 8 : डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे आप्पा साहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमदार अमित घोडा व पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे यांच्या हस्ते केळवे समुद्र किनारी श्री सदस्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने सुरुच्या झाडांची लागवड केली.

दोन वर्षापुर्वी आलेल्या चक्री वादळाचा केळवे समुद्र किनार्याला मोठा तडाखा बसला होता. यावेळी येथील शेकडो सुरुची झाडे उन्मळुन पडल्याने समुद्र किनारा ओसाड पडला आहे. त्यामुळे आज श्री सदस्य, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संयोजनातुन येथे 2500 सुरुच्या झाडांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे लागवड करण्यात आलेल्या वृक्षांचे संवर्धन करुन दरमहा अहवाल तयार करण्यात येणार आहे. तसेच वृक्ष मृत झाल्यास तात्काळ त्या ठिकाणी दुसरे वृक्ष लावुन त्याचे संवर्धन करण्याबाबत संस्थमार्फत नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काही वर्षात केळवे समुद्रकिनाराच्या सौंदर्यात भर घालणारी सरुची झाडे पुन्हा येथे पाहायला मिळणार आहेत.
या वृक्षारोपण कार्यक्रमास केळवे ग्रामपंचायतीच्या सरपंच भावना किणी, उपसरपंच सदानंद राऊत, ग्राम विकास अधिकारी दिनकर मोढवे तसेच ग्रामपंचायत सदस्य, श्री सदस्य व मोठ्या संख्येने केळव्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.
नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान मार्फत राज्यभरासह पालघर जिल्ह्यात स्वच्छता शिबीर, जिल्हा परिषद शाळेतील मुलांना वह्या वाटप, स्मशान भुमी स्वच्छता, गाव पाड्यांतील सार्वजनिक विहीरींची स्वच्छता, सरकारी कार्यालयांची स्वच्छता, आरोग्याबाबत जन जागृती आदी उल्लेखनीय कामे कली जातात.