पालघर : सातपाटीत गावठी दारुचा अड्डा उद्ध्वस्त

0
3156

पालघर, दि. 11 : तालुक्यातील सातपाटी पोलीस स्टेशन हद्दीतील वडराई गावात बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या एका गावठी हातभट्टीची दारु विक्री करणार्‍या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून 12 हजार 130 रुपये किंमतीची दारु जप्त केली आहे. तसेच याप्रकरणी नरेंद्र ज्ञानेश्‍वर मोर (वय 45) नामक इसमावर गुन्हा दाखल केला आहे.

या अड्ड्याबाबत गुप्त माहिती मिळाल्यानंतर काल, 10 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजेच्या सुमारास पोलिसांनी हा छापा टाकला. यावेळी पोलिसांना विविध प्लास्टिक ड्रममध्ये भरलेली शेकडो लिटर दारु आढळून आली. त्यानंतर पोलिसांनी सदर दारु जप्त करत आरोपी नरेंद्र मोर याच्याविरुद्ध सातपाटी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला असुन अधिक तपास सुरु आहे.