नॅशनल मेडीकल कमिशन बिलला कडाडून विरोध करा! – डॉ. पार्थिव संघवी

0
2443
दि. २५: केंद्र सरकारने प्रस्तावित केलेले नॅशनल मेडीकल कमिशन बिल हे वैद्यकीय क्षेत्राची अपिरिमीत हानी करणारे असून या बिलाला कडाडून विरोध करा व याबाबत जनजागृती करा असे आवाहन इंडियन मेडीकल असोसिएशनचे (आयएमए) महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी पार्थिव संघवी यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते आयएमए च्या डहाणू शाखेच्या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. एकीकडे आयुर्वेद आणि होमिओपॅथी शास्त्रातील वैद्यकीय व्यावसायिकांना ब्रिज कोर्सद्वारे ॲलोपॅथीची प्रॅक्टीस करण्यासाठी दरवाजे उघडायचे आणि दुसरीकडे ॲलोपॅथीच्या औषधशास्त्रात शिक्षण घेणाऱ्यांना पुन्हा परिक्षेला बसवायचे हा विरोधाभास प्रस्तावित बिलामध्ये आढळून येत असल्याचे देखील डॉ. पार्थिव म्हणाले. खासगी महाविद्यालयाना हवी तितकी फि आकारण्याची मुभा देणाऱ्या या प्रस्तावित बिलामुळे वैद्यकीय क्षेत्रात भ्रष्ट्राचार थैमान घालेल आणि पर्यायाने रुग्णांचे नुकसान होईल असा इशारा देखील डॉ. पार्थिव यांनी दिला.
 इंडियन मेडीकल असोसिएशनच्या डहाणू शाखेतर्फे आयोजीत स्नेहसंमेलनात विशेष अतिथी म्हणून आयएमएचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष विपिन चेकर, डहाणूचे नगराध्यक्ष भरत राजपूत, नगरसेवक जगदीश राजपूत, आयएमएचे डहाणू शाखेचे अध्यक्ष डॉ. अशोक कांबळे, सेक्रेटरी डॉ. निलोफर पूनावाला उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते  आयएमए डहाणू शाखेच्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
 या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित आमदार पास्कल धनारे यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवून ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये प्रचार करणे पसंत केले. आमदार झाल्यापासून आयएमए तर्फे लागोपाठ ३ वर्षे धनारेंना निमंत्रित करण्यात येत असले तरी पहिल्या वर्षी हजर राहिल्यानंतर सलग २ वर्षे आमदारांनी डॉक्टर मंडळींबद्दल अनास्था दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून डॉक्टर मंडळींना देखील राजकीय व्यक्तींबाबत असलेले आकर्षण अधोरेखीत झाले आहे.
Konnect IT Gudipadwa