माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा लाभ घेण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आवाहन

0
2198

पालघर, दि. 16 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची राज्यात सुरवात झाली असून पालघर जिल्ह्यातील सर्व महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायत व ग्रामपंचायत स्तरावर ही योजना राबवण्यात येत आहे व त्यास जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले.

कोव्हिड-19 (कोरोना) विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून या महामारीवर संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहीमेचा मोठा वाटा असेल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचून त्यांची आरोग्य तपासणी करणे, त्याचबरोबर प्राणवायू पातळी तपासणे, आरोग्य शिक्षणासह महत्वाचे आरोग्य संदेश देणे, कोव्हिड-19 चे संशयित रुग्ण शोधणे, उपचारासाठी संदर्भ सेवा देणे व आरोग्याविषयी जागृती करणे आदी बाबी या मोहिमेत राबविल्या जाणार असल्याची माहिती डॉ. गुरसळ यांनी दिली.

माझे कुटुंब-माझी जबाबदारी ही मोहीम वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याबाबत अशी अत्यंत आवश्यक त्रिसुत्रीवर आधारित असणार आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवणे, मास्कचा नियमित व योग्य वापर करणे, वारंवार हात स्वच्छ धूणे तसेच निजंतुकीकरणाचा योग्य वापर करणे याबाबतचे महत्व नागरिकांना मोहिमेत पटवून दिले जाणार आहे.

वैयक्तिक व कौटुंबिक स्तरावर, सोसायटी-वसाहतींमध्ये घ्यावयाची काळजी, दुकाने, मंडी, मॉल्समध्ये खरेदीसाठी जाताना, कार्यस्थळी, कार्यालयांमध्ये घ्यावयाची काळजी तसेच खाजगी व सार्वजनिकरित्या प्रवास करताना घ्यावयाची काळजी या बाबतची सविस्तर माहिती नागरिकांना या मोहिमद्वारे देण्यात येणार आहे.