बोईसर, दि. 10 : येथील तुंगा रुग्णालयात करोना रुग्णाला देण्यात आलेल्या बिलाच्या रक्कमेवरुन उद्भवलेल्या वादातून भाजपाचे स्थानिक कार्यकर्ते प्रशांत संखे यांनी रुग्णालयाच्या व्यवस्थापकाला कानशिलात लगावत तोडफोड केल्याची घटना काल, रविवारी घडली. बोईसर पोलिसांनी याप्रकरणी संखे यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या महितीनुसार, तुंगा या खाजगी रुग्णालयात करोनावर उपचार घेतलेल्या एका रुग्णाला 86 हजार रुपयांचे बिल देण्यात आले होते. बिलाची रक्कम जास्त आकारल्याच्या भावनेतून रुग्णाच्या नातेवाईकांनी बिल कमी करण्याच्या हेतूने भाजप कार्यकर्ते प्रशांत संखे यांना रुग्णालयात बोलावले. यावेळी रुग्णालयातील करोना उपचार केंद्राचे व्यवस्थापक संतोष शेट्टी आकारलेल्या बिलाबाबत समजावत असतानाच, यातून वाद उद्भवला. या वादाचे रुपांतर पुढे मारहाणीत होऊन संखे यांनी शेट्टी यांना कानशिलात लगावली. यावेळी रुग्णालयातील साहित्यांची देखील उपस्थित जमावाकडून तोडफोड करण्यात आली.
या घटनेनंतर रुग्णालयातील कर्मचार्यांनी संखे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच गुन्हा दाखल न केल्यास संपाचा इशारा दिला. यानंतर बोईसर पोलिसांनी संखे यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेचे कलम 353 व 332 सह डॉक्टर संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. तर संबंधित रुग्णाच्या दोन नातेवाईकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले असुन दोघेही फरार असल्याची माहिती मिळाली आहे.