बोईसर : विषारी वायुची लागण झाल्याने कर्मचार्‍याचा मृत्यू

0
2412

तारापुर एमआयडीसीतील घटना

वार्ताहर/बोईसर, दि. 29 : तारापुर औद्योगिक क्षेत्रातील (एमआयडीसी) औषधाचा कच्चा माल बनविणार्‍या कारखान्यात विषारी वायुची लागण होऊन एका कर्मचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कारखान्यात उत्पादन प्रक्रिया सुरू असताना रासायनिक अभिक्रिया झाल्याने त्यातुन निघालेल्या विषारी वायुची लागण होऊन सदर कर्मचार्‍याचा मृत्यू झाला आहे.

तारापुर औद्योगिक क्षेत्रातील एसएनए हेल्थ केअर (प्लॉट नं- टी 8) या औषधे तयार करण्यासाठी लागणारा कच्चामाल बनविणार्‍या कारखान्यात मंगळवारी दुपारी उत्पादनावर प्रक्रिया सुरू होती. याच दरम्यान रासायनिक अभिक्रिया झाल्याने त्यातून निघालेल्या विषारी वायुची लागण तेथे उपस्थित असलेल्या व केमिस्टचे काम करणार्‍या प्रशांत अशोक राजमाने या कर्मचार्‍याला झाली. यानंतर प्रशांतला तत्काळ उपचारासाठी बोईसरच्या खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आलेे. परंतु येथे उपचारादरम्यान त्याचा बुधवारी मृत्यू झाला.

दरम्यान, रासायनिक अभिक्रियेतून तयार झालेल्या सोडियम नायट्रेड वायुमुळे प्रशांतचा मृत्यू झाल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार समजले असुन अशा घातक जीवघेण्या वायुची लागण अधिक प्रमाणात कामगारांना झाली असता मोठा अनर्थ झाला असता. ही घटना घडली तेव्हा 15 कामगार त्याठिकाणी उपस्थित होते. मात्र सुदैवाने सर्व 15 कामगार सुखरुप असल्याचे समजते.