पालघर पोलीसांना मोठे यश: २६ गुन्ह्यांची उकल

0
2411

6 दरोडेखोरांसह 2 सोनसाखळी चोरटे गजाआड

DARODEKHOR ATAKराजतंत्र मिडीया / पालघर दि. १२ : अलीकडेच पालघर ते मनोर दरम्यानच्या रस्त्यावरील वाघोबा खिंडीत दरोडा टाकण्याच्या प्रयत्नातील 2 आरोपींना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल हस्तगत करण्यात पोलीसांना यश मिळाले असून काही दिवसांपुर्वीच एका पेट्रोलपंपावर दरोडा टाकल्याप्रकरणी 4 आरोपींना देखील मुद्देमालासह अटक करण्यात आली आहे. त्या शिवाय पालघर जिल्ह्यात ठिकठिकाणी मोटारसायकलवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावण्याच्या गुन्ह्यातील आरोपींची धरपकड करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 24 गुन्ह्यांची कबुली मिळाली असून अर्धा किलो सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. पालघरचे जिल्हा पोलीस अधिक्षक मंजूनाथ सिंगे यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी अतिरिक्त पोलीस अधिक्षक योगेश चव्हाण आणि उप विभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक उपस्थित होते. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहाय्यक फौजदार विनायक ताम्हणे, भरत पाटील, सुनील नलावडे, दीपक राऊत, पोलीस नाईक संदीप सूर्यवंशी, सचिन मर्दे, नरेंद्र पाटील, पोलीस शिपाई नरेंद्र जनाठे यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

मागील महिन्यात 22 जुन रोजी रात्रीच्या सुमारास पालघर-मनोर रस्त्यावरुन प्रवास करणार्‍या वाहनांवर वाघोबा खिंड परिसरातील जंगलात लपलेल्या दरोडेखोरांकडून दरोड्याच्या उद्देशाने दगडफेक करण्यात आली होती. यावेळी दरोडेखोरांना पकडण्याचा प्रयत्न करणार्‍या पोलीसांवर गोळीबार देखील करण्यात आला होता. या गंभीर घटनेबाबत पोलीसांनी तपास करत एका संशयिताला गुन्हा घडल्याच्या दुसर्‍या दिवशी तर अन्य एकाला 2 जुलै रोजी अटक केली होती. या दोघांकडे सखोल चौकशी केली असता दोघांनीही गुन्हा कबूल केला असुन त्यांच्याकडून एक पिस्तुल व 2 जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. दरम्यान, दोघा आरोपींविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड विधान संहितेच्या कलम 307, 397, 342, 511, सह आर्म अ‍ॅक्ट 3,25,27 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सहाय्यक पोलीस निरिक्षक सुनिल जाधव अधिक तपास करित आहेत.
 पेट्रोलपंप चालकाला लुटणारे 4 दरोडेखोर गजाआड
4 जुन रोजी पेट्रोलपंप बंद करुन घरी परतणार्‍या पेट्रोलपंपाच्या मालकाला रस्त्यात अडवून त्याच्याकडील साडेपाच लाखांची रक्कम दरोडा टाकून लुटून नेणार्‍या 4 जणांनाही अटक करण्यात पालघर पोलीसांना यश आले आहे. रविंद्र अशोक पिंपळे (वय 24), प्रदिप जान्या वाढाण (वय 23), सचिन अशोक शिंदे (वय 26) व संतोष रघुनाथ चाकर  (वय 23, सर्व रा. वंकासपाडा ता.जि. पालघर) अशी सदर दरोडेखोरांची नावे असुन त्यांच्याकडून 2 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
सोनसाखळी चोरटे जेरबंद
पालघर जिल्ह्यातील विविध भागात तोतया पोलीस बनून तसेच भरधाव वेगात दुचाकीवरुन महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करुन नागरीकांसह पोलीसांच्या नाकीनऊ आणणार्‍या दोन जणांना अटक करण्यात अखेर पोलीसांना यश आले आहे. फिरोज एहसान अली (रा. नागपुर, राज्य महाराष्ट्र) व जमाल युसुफ सय्यद अली (रा. हौशंगाबाद, राज्य मध्यप्रदेश) अशी या दोघांची नावे आहेत.
अटकेत असलेल्या या दोघा आरोपींनी जिल्ह्यातील वसई, नालासोपारा, विरार, पालघर, बोईसर, डहाणु, सातपाटी, वाडा आदी शहरांमधील नागरीकांना आम्ही पोलीस आहोत, पुढे खुन झाला आहे, आमच्या मालकाला मुलगा झाला आहे पुढे ते भेटवस्तु वाटत आहेत. तुमच्याकडील सोन्याचे दागिने काढुन ठेवा, अशी कारणे सांगून हातचलाखी करुन नागरीकांचे सोन्याचे दागिने लुटणे तसेच दुचाकीवरुन भरधाव वेगात येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरी करुन धुमाकुळ घातला होता.
याबाबत तपास करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीसांतर्फे विविध पथके तयार करण्यात आली होती. या पथकांनी खबर्‍यांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार दिल्ली, मध्यप्रदेश, नागपुर, अकोला आदी ठिकाणी जाऊन तपास करत फिरोज व जमालला अटक केली. या दोघांनी पोलीस कोठडीदरम्यान आपला गुन्हा कबूल केला असुन त्यांच्या चौकशीतून 16 जबरी चोरीचे गुन्हे व 8 फसवणुकीचे गुन्हे अशा तब्बल 24 गुन्ह्यांची उकल झाली आहे. या दोघांकडून 12 लाख 54 हजार रुपये किंमतीचे 410 ग्रॅम वजनी सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.
फिरोज एहसान अली विरोधात सातपाटी, वाडा, पालघर, तुळींज, विरार, वालीव, अर्नाळा, माणिकपुर, नालासोपारा, बोईसर अशा विविध पोलीस स्थानकात 16 तर जमाल युसुफ सय्यद अली विरोधात पालघर, विरार, डहाणू, नालासोपारा, बोईसर, तुळींज, माणिकपुर अशा विविध पोलीस स्टेशनमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत.
 दरम्यान, पोलीस या दोघांची कसुन चौकशी करत असुन चौकशीदरम्यान अजुनही काही गुन्हे उकल होण्याची शक्यता पोलीसांनी वर्तवली आहे.
——————————————————————————————————————————
  • वाघोबा खिंडीत दरोडा पाडण्यासाठी ४ जणांची टोळी टपून बसली होती. त्यातील संतोष भोगे हा आरोपी मद्यपान केल्याने सर्च ऑपरेशनमध्ये पोलीसांना सापडला. अन्य ३ आरोपी पळून गेले. त्याचवेळी तिथे दारुची पार्टी करण्यासाठी बसलेले ४ जण पोलीसांच्या ताब्यात सापडले होते. त्यांना चौकशी करुन सोडून देण्यात आले. मात्र या गुन्ह्यात तयार झालेला संभ्रम दूर करण्यासाठी पोलीसांसमोर आव्हान उभे राहिले होते. दुसरा आरोपी हाती लागल्यामुळे पोलीसांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. दुसरा आरोपी स्वप्नील साळकर याच्या हाताला पोलीसांनी केलेल्या गोळीबारात गोळी लागली होती. त्याने स्थानिक डॉक्टरकडून उपचार केल्यानंतर पोलीसांना खबर मिळाली व पोलीसांनी त्याच्यावर झडप टाकली. त्यानंतर स्वप्नीलने जंगलात फेकून दिलेले पिस्तूल देखील हस्तगत करण्यात आले. २ आरोपी फरार असून सर्वच आरोपी वाणगांव परिसरातील रहाणारे आहेत. हे आरोपी नवखे होते व त्यांचा पहिलाच प्लॅन फसला आहे. पालघर मनोर रस्त्यावरून जाणाऱ्या विविध बॅंकांच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरणाऱ्या एखाद्या व्हॅनला लुटून पैसेवाले होण्याचा आरोपींचा इरादा होता.
—————————————————————————————————————————-