बोईसरमध्ये पोलीस विरुद्ध पोलीस : पोलीस निरिक्षकाची हवालदार विरोधात तक्रार

0
2116

बोईसर, दि. १७: पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरु करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस हवालदाराने पोलीस निरीक्षकाला प्रलोभन दाखवल्याच्या कथित आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि विशेष पथकातील या संघर्षामुळे पालघर पोलीस दलाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.

जनार्दन परबकर हे बोईसर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक पदावर कार्य़रत आहेत. तर रमेश नौकुडकर हे स्थानिक गुन्हे शाखेत हवालदार म्हणून कार्यरत आहेत. बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करू नये, तसेच अवैध धंद्ये बंद करू नयेत यासाठी नौकुडकर यांनी ११ जून रोजी परबकर यांची बोईसर पोलीस ठाण्यात भेट घेऊन त्यांना प्रलोभन दाखविल्याचा आरोप आहे.
याबाबत परबकर यांनी १६ जून रोजी स्वतःच्याच पोलीस ठाण्यात भ्रष्ट्राचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंदवला असून बोईसरचे उप विभागीय अधिकारी विश्वास वळवी हे अधिक तपास करीत आहेत. यापूर्वी देखील पालघर जिल्हा पोलीस दलाच्या विशेष पथकातील कर्मचाऱ्यांवर खंडणीचे गुन्हे दाखल झाले होते.
जनार्दन परबकर आणि विशेष पथके यांच्यात कटूता:-
अलीकडे विशेष पथके ही स्थानिक पोलीस ठाण्यांपेक्षा वरचढ ठरताना दिसताहेत. त्यांच्या हस्तक्षेपामुळे स्थानिक अधिकारी त्रस्त होतात. त्यांच्या अधिकारांवर मर्यादा येत असल्याची भावना बळावते. जनार्दन परबकर हे डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी असताना विशेष पथकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या होत्या. यामुळे परबकरांवर नामुष्कीची वेळ आली होती.
पोलीस अधिक्षकांच्या हस्तक्षेपाची मागणी:
स्थानिक गुन्हे शाखा ही थेट पोलीस अधिक्षकांच्या नियंत्रणाखाली चालते. त्यामुळे त्यांच्या पथकातील कर्मचारी वादग्रस्त ठरत असेल तर पोलीस अधिक्षकांनी गांभीर्याने दखल घ्यावी. तसेच जनार्दन परबकर आणि रमेश नौकुडकर या दोघांचेही पोलीस अधिक्षक हे वरिष्ठ असल्याने त्यांनी दोघांनाही मुख्यालयात जमा करुन तटस्थपणे चौकशी करावी अशी अपेक्षा लोकांकडून व्यक्त होत आहे.