डहाणू व तलासरीला भूकंपाचे धक्के दिवसभरात 6 धक्क्यांची नोंद

0
1956

LOGO-4-Onlineप्रशासनाची आपत्कालीन व्यवस्थापन तयारी सुरु , तंबूंची उपलब्धता करण्याबाबत गांभीर्याने विचार

राजतंत्र न्युज नेटवर्क
डहाणू दि. 1: आज सकाळपासून डहाणू व तलासरी तालुक्यांना भूकंपाचा तडाखा बसला असून दिवसभरात 6 धक्के बसले. भूकंपाची तीव्रता वाढल्याचे निदर्शनास आले असून आज दुपारी 2.06 वाजताचा धक्का हा सर्वाधिक 4.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा होता. याशिवाय काही धक्के लोकांना जाणवले असले तरी त्याची भूकंपमापन यंत्रामध्ये नोंद झालेली आढळत नाही. ते कमी तीव्रतेचे असावेत असा अंदाज आहे. दिवसभरातील धक्का मालिकांमुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण असून जिल्हा प्रशासन लोकांसाठी मंडप उभारुन निवासाची व्यवस्था करण्याच्या तयारीत आहे.

या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कुठेही जिवीत हानी झालेली नसली तरी अनेक घरांना तडे गेल्याचे अथवा भिंती कोसळल्याचे प्रकार घडल्याची वृत्त हाती येत आहेत. 

याबाबत आपत्ती व्यवस्थापन विषयाचे उप जिल्हाधिकारी विवेक कदम यांना विचारले असता याबाबत मंत्रालयाशी सातत्याने संपर्कात असून लोकांच्या निवासासाठी तंबूंची उपलब्धता करण्याबाबत विचारविनिमय केला जात असल्याची माहिती त्यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना दिली.

पहिला धक्का सकाळी 6.58 वाजता, 3.3 रिश्टर स्केल तिव्रतेचा

दुसरा धक्का सकाळी 10.03 वाजता, 3.5 रिश्टर स्केलचा (तुलनेने अधिक)

तिसरा धक्का सकाळी 10.29 वाजता, 3.0 रिश्टर स्केलचा

चौथा धक्का दुपारी 2.06 वाजता, आजपर्यंतचा सर्वात मोठा 4.1 रिश्टर स्केलचा

पाचवा धक्का सायंकाळी 3.53 वाजता, 3.6 रिश्टर स्केलचा

सहावा धक्का सायंकाळी 4.47 वाजता, 3.5 रिश्टर स्केलचा

▶ या सर्व भूकंपांचे केंद्रबिंदू अक्षांश 19.9 ते 20.0 N व रेखांश 72.8 ते 72.9 E दरम्यान असेच आहेत.
▶ यातील पहिला भूकंप 10 किलोमीटर खोलीवर झाला तर उर्वरित सर्व भूकंप 5 किलोमीटर खोलीवर होते.

सुरक्षिततेसाठी कच्च्या घरातील रहिवाशांनी घराबाहेर झोपावे – जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

 पालघर, दि. 1- डहाणू आणि तलासरी तालुक्यात होत असलेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनामार्फत दक्षता घेण्यात येत असून आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. सर्व संबंधित विभागांच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून आरोग्य विभागास त्यांची यंत्रणा भूकंपप्रवण भागात तैनात ठेवण्यास सांगण्यात आले आहे. कोणीही अफवा पसरवू नये किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.

रहिवाशांच्या सोयीसाठी एनडीआरएफ मार्फत तंबू मागविण्यात आले असून ते पोहोचताच या परिसरातील रहिवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात  येतील, असेही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दक्षता म्हणून या भागातील ज्या रहिवाशांची घरे कच्च्या बांधकामाची किंवा असुरक्षित आहेत, त्यांनी रात्री घरात न थांबता बाहेर सुरक्षित ठिकाणी झोपावे, स्थानिक अधिकाऱ्यांनी रहिवाशांना दक्ष करावे, असे आवाहन संचालक, राज्य आपत्ती नियंत्रण कक्ष यांच्यामार्फत करण्यात आले आहे.

 [divider]
  • आपण दैनिक राजतंत्रचे App आपल्या स्मार्टफोनमध्ये Download केलेत का?
  • दैनिक राजतंत्रच्या विश्वसनीय बातम्या आपल्या मोबाईलमध्ये मिळविण्यासाठी खालील Link ला भेट द्या!
  • स्वतः Download करा आणि इतरांनाही सांगा!

➡ DOWNLOAD APP

ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी दैनिक राजतंत्रचे फेसबुक पेज LIKE करा