वसई, दि. 24 : नालासोपार्यातील तुळींज पोलीस स्टेशनमध्ये कर्तव्यावर असलेल्या एका 42 वर्षीय पोलीस कर्मचार्याने पोलीस निरिक्षकांच्या दालनाताच स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. सखाराम भोये असे सदर पोलीस कर्मचार्याचे नाव असुन ते हेड कॉन्स्टेबल पदावर कार्यरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, काल 23 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास हेड कॉन्स्टेबल भोये यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं समजतं. त्यांनी तीन ते चार वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरिक्षकांच्या दालनातील रेस्टरुममध्ये जाऊन स्वत:वर गोळी झाडून घेतली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. सकाळी सफाई कर्मचारी सदर ठिकाणी पोहोचल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. दरम्यान, भोये यांच्या आत्महत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट असुन पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करुन अधिक तपास सुरु केला आहे.
सखाराम भोये 2003 च्या बॅचचे होते. ते नाशिकमधील हरसूल गावचे रहिवासी होते. ते 2016 पासून तुळींज पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील व दोन मुलं असा परिवार आहे.