नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जांच्या सर्वेक्षणासाठी केली होती लाचेची मागणी

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 1 : महावितरणच्या बोईसर उप विभागाच्या वरिष्ठ तंत्रज्ञाला दिड हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. बोईसमधील भिमनगर येथे शनिवारी (दि.30) ही सापळा कारवाई करण्यात आली. पंकज सदानंद धनपाल (36) असे सदर लाचखोर तंत्रज्ञाचे नाव असून नवीन मीटरसाठी केलेल्या अर्जाचे सर्वेक्षण करण्यासाठी त्याने तक्रारदाराकडून लाचेची मागणी केली होती.

अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती महावितरणची एजंट असून त्यांना त्यांच्या 3 ग्राहकांचे नवीन मिटर कनेक्शन देण्यासाठी केलेल्या अर्जाचे सर्व्हेक्षण करुन सही देण्यासाठी वरीष्ठ तंत्रज्ञ पंकज धनपाल यांनी प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे एकुण दिड हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे तक्रार नोंदवल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पालघर कँम्पकडून 29 व 30 नोव्हेंबर रोजी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. या पडताळणी दरम्यान धनपाल यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे 30 ऑक्टोबर रोजीच भिमनगर येथील राहूल मेडीकल शेजारील मांगेलाल यांच्या हॉटेलमध्ये सापळा रचण्यात आला व वरीष्ठ तंत्रज्ञ धनपाल यांना तक्रारदाराकडून लाच स्विकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली.
दरम्यान, दहा दिवसांपुर्वीच अशा प्रकारे एजंटचे काम करुन देण्यासाठी त्याच्याकडे 6 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या महावितरणच्या वसई तालुक्यातील वालीव शाखेचा सहाय्यक अभियंता कश्यप मनोहर शेंडे (वय 42) याला लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली होती.
कोणत्याही शासकीय अधिकारी-कर्मचार्यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसमाने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तात्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर कँम्पचे पोलीस उप अधीक्षक कलगोंडा हेगाजे यांनी केले असुन तक्रारीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
- दुरध्वनी क्रं. 02525-297297
- व्हॉट्सअॅप .क्रं.9552250404/9930997700
- टोल फ्रि क्रं. 1064