मराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने -प्रा. अनिल मांझे

0
10535

मराठी भाषा : व्यवसायसंधी आणि आव्हाने हा खरे पाहता एका लेखाचा विषय नसून स्वतंत्र पुस्तकाचा विषय होऊ शकेल याबद्दल शंका नाही. प्रस्तुत विषयाचा पसारा लेखात मांडताना अनेक घटकांचा केवळ नामोल्लेख करून, तर काहांना  ओलांडून पुढे जावे लागण्याची शक्यता आहे. प्रस्तुत लेखाची ही मर्यादा सुरुवातीलाच मान्य करावी लागेल.

अलीकडील काळात भाषिक आस्मता हा त्या त्या भाषिक समाजाचा जिव्हाळ्याचा विषय ठरू पाहात आहे. आणि त्यात अजिबात काही गैर नाही. भाषा म्हणजे एक संस्कृतीच असते. कोणतीही भाषा नष्ट होते तेव्हा संपूर्ण समाज त्या विशिष्ट भाषेपासून दुरावत असतो. या दृष्टिकोनातून भाषिक अवशेष टिकवून ठेवणे ही त्या त्या भाषिक समूहाची जबाबदारी ठरते.
ठमराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झाला आहेठ असे म्हणून गळा काढणारे काही कमी नाहीत. अशा गळेकाढू लोकांकडून प्रत्यक्षात मात्र भाषासंवर्धनाचे कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाहीत. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करून किंवा मराठी भाषा दिन साजरा करून मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार खरंच शक्य आहे का हा मोठाच प्रश्‍न आहे. त्यातून भाषावृद्धीसाठी प्रयत्न केल्याचे फसवे समाधान मिळू शकेल मात्र वास्तव बदलणार नाही. यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणे गरजेचे आहे.     डॉ. रमेश धोंगडे या भाषासंशोधकाच्या मते, भाषेचा तथाकथित विकास हा भाषेच्या प्रसारातून आणि मुख्यत: तिच्या वापरातूनच तपासता येतो. म्हणजेच दैनंदिन व्यवहारात ती भाषा किती प्रमाणात वापरली जाते यावरूनच त्या भाषेच्या भवितव्याबाबतचे आडाखे बांधणे शक्य आहे.
’डायनीएल एब्राम’ या अमेरिकेतील गणिताच्या अभ्यासकाच्या मते, एखादी विशिष्ट भाषा ही ती भाषा बोलणार्‍या समाजास व्यवसाय देवू शकत नसेल तर ती भाषा तो भाषिक समाज सोडून देण्याचा प्रयत्न करतो. याचा अर्थ भाषासंहाराचे मूळ हे व्यवसाय आणि पर्यायाने उदरनिर्वाह या घटकात आहे असे मानता येईल. मराठी भाषेसंदर्भात बोलायचे झाल्यास दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा वापर वाढायला हवा, मराठी भाषेची सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हायला हवी आणि मुख्य म्हणजे मराठी भाषेच्या उपयोजनातून जास्तीत जास्त व्यवसायसंधी उपलब्ध व्हायला हवी. वस्तुत: मराठी भाषा मोठ्या प्रमाणात रोजगार पुरवू शकते. परंतु त्यासाठी संकुचित मानसिकतेचा त्याग करून काही आव्हाने स्वीकारावी लागतील, भाषिक पूर्वग्रह सोडावे लागतील.  भाषा म्हणून विचार करता असे विधान करता येईल की जेवढ्या व्यवसायिक संधी इंग्रजीतून शक्य आहेत तेवढ्याच संधी मराठीतून उपलब्ध होऊ शकतात. यासाठी न्यूनगंड न बाळगता विविध क्षेत्रांमध्ये असलेल्या संधीचा अचून फायदा उचलता यायला हवा. आजच्या स्पर्धात्मक काळात प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची गरज असते. त्यामुळे अमुक एखादे क्षेत्र वा विषय उच्च श्रेणीचा व दुसरा कमी श्रेणीचा समजण्याची गल्लत करू नये. कोणत्याही विषयात परिपूर्ण ज्ञान मिळविणे, त्या विषयाच्या संकल्पना समजून घेणे आणि त्या विषयाच्या अभ्यासातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रभावीरीत्या वापर करता येणे ही करिअर घडवण्याच्या दृष्टिकोनातून यशाची गुरूकिल्ली आहे असे म्हणता येईल. या परिप्रेक्ष्यातून व्यवसायपूरक अशा काही क्षेत्रांची चर्चा करणे इष्ट ठरेल.
1. भाषांतर, अनुवाद : जागतिकीकरणाचा परिणाम म्हणून विविध भाषा-संस्कृती यांचा परिचय होऊ लागला. अन्य भाषांमध्ये निर्माण होणारे ज्ञान स्वभाषेत उपलब्ध व्हावे अशी अपेक्षा वाचक आणि लेखक यांना असणे स्वाभाविक आहे. भाषांतर आणि अनुवादासाठी अथांग भांडार आज मराठी भाषेसमोर उभे आहे. अन्य भाषांमध्ये उपलब्ध असलेले दर्जेदार साहित्य स्वभाषेत आणून वाचकांना त्यांचा परिचय करून देण्यासाठी भाषांतराचा आधार घेतला जातो. यासाठी किमान दोन भाषांवर प्रभुत्व असणे गरजेचे आहे. केवळ भाषा लिहिता-वाचता येणे म्हणजे भाषिक क्षमता नाही. तर दोन भाषांमधील समाज- संस्कृतीचा अभ्यास असणेही आवश्यक आहे. इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, रशियन, चीनी आणि अन्य भाषांमध्ये ज्ञानाचा खजिना आहे. तो मराठी भाषकांपर्यंत पोहचण्यात भाषा हा अडसर ठरू नये यासाठी जास्तीत जास्त भाषांतरे व्हायला हवीत. भाषांतरात मौखिक व लिखित असा भेद करता येईल. दोन भिन्न भाषिकांमध्ये मौखिक भाषांतर करणारा दुभाषी हेसुद्धा उदयाला आलेलं एक क्षेत्र आहे. भाषांतर हा आधुनिक काळात मोठ्या प्रमाणात व्यवसाय संधी उपलब्ध करून देणारा विभाग आहे.
2. आकाशवाणी  :  मौखिक आणि लिखित दोन्ही भाषिक कौशल्ये असल्यास आकाशवाणी ही सुवर्णसंधी ठरू शकते. वृत्तनिवेदक, रेडिओ जॉकी, मुलाखतकार, पत्रकारिता, नभोनाट्य, डबिंग यांसारखी अनेक क्षेत्रे उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये आत्मसात करायला हवीत. रेडिओ जॉकीसाठी किमान तीन भाषा अस्खलीत बोलता यायला हव्यात. बहुश्रुतपणा, श्रोत्यांना खिळवून ठेवून सलग तीन तास मनोरंजन करण्याची क्षमता विकसित करायला हवी.
3. दूरचित्रवाणी  :  दूरदर्शन आणि अखंडपणे सुरू असणार्‍या खाजगी वाहिन्या यांमध्ये अनेक करियरच्या वाटा निर्माण झाल्या आहेत. वृत्तनिवेदनासोबतच वाहिन्यांवरील चर्चा, परिसंवाद, मुलाखत तसेच कॅमेरा युनिटसह होणारे वृत्तांकन यांमधून अनेक नवी क्षेत्रे खुणावत आहेत. याशिवाय वाहिन्यांवरील कार्यामांचे सूत्रसंचालन, मालिकांचे पटकथालेखन, संवादलेखन, जाहिरात इत्यादी घटकांकडे व्यवसाय म्हणून पाहता येईल.
4. प्रिंट मिडिया  : वृत्तपत्रे, नियतकालिके व अनियतकालिके यांमध्ये भाषिक क्षमतेची कसोटी लागते. बातमीदार ते संपादक अशी चढती पदनामावली यात कार्यरत असते. बातमी, लेख, अग्रलेख, विविध सदरे यांमधून अनेक विषयांचे अभ्यासपूर्ण विश्‍लेषण करावे लागते. वृत्तपत्रीय लेखनाला धावपळीचे साहित्य असे म्हणतात. स्वाभाविकपणे नियोजित आणि अनियोजित अशा दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी तत्पर राहून  विहित वेळेत विश्‍लेषण करण्याची क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. जाहिरात, छपाई, अक्षरजुळणी, संपादन कौशल्य अशा विविध विभागांकडेही सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं.
5. चित्रपट व नाट्यक्षेत्र  :  मनोरंजन क्षेत्राने आज मानवी जीवन व्यापून टाकले आहे. चित्रपट आणि नाटक हे यातील महत्त्वाचे घटक. चित्रपटनिर्मितीत मराठी भाषा पटकथालेखन, संवाद आणि गीतरचना यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. अर्थातच केवळ भाषिक क्षमता नाही तर प्रतिभाशक्तीची जोड असेल तरच नवनिर्मिती होऊ शकते. नाट्यसंहितालेखनाच्या बाबतीत हेच सूत्र महत्त्वाचे ठरते. संवादफेक किंवा साहित्यभाषेत ज्याला वाचिक अभिनय म्हणतात यांना चित्रपट व नाट्य अशा दोन्ही क्षेत्रांत विशेष महत्त्व असते. आवश्यक ते भाषिक ज्ञान असेल तर प्रसिद्धी आणि पैसा दोन्हीही मिळवून देणारी चित्रपट व नाट्य ही क्षेत्रे व्यवसाय म्हणून निश्चितच महत्त्वाची ठरू शकतील.
6. साहित्य-समीक्षा (सर्जनशील लेखन) : प्रतिभा, विद्वत्ता आणि त्याला सातत्यपूर्ण अभ्यासाची जोड मिळाल्यास कसदार साहित्यनिर्मिती घडू शकते. कविता, नाटक, कादंबरी, कथा, प्रवासवर्णन, चरित्र, आत्मचरित्र यांसारख्या सृजनशील लेखनाकडे अलीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ लागले आहे. पुस्तकपरीक्षण, नाट्यपरीक्षण, चित्रपटसमीक्षा, साहित्यसमीक्षा, व्याकरण, कोशनिर्मिती, ह्यासारख्या लेखनातून करियरच्या नव्या वाटा सापडू शकतात. भाषिक क्षमतेसोबतच नवनिर्मितीची क्षमता असणार्‍यांनी या क्षेत्राचा व्यवसाय म्हणून नक्की विचार करावा.
7.  सूत्रसंचालन  :  अलीकडील काळात सूत्रसंचालन हा मान्यताप्राप्त व्यवसाय म्हणून स्वीकारलेला दिसतो. पुरस्कारवितरण सोहळा, सांस्कृतिक कार्याम, रिऍलिटी शोज, विविध सादरीकरणाचे कार्याम, वाहिन्यांवरील कार्याम, शासकीय कार्याम किंवा अन्य प्रासंगिक कार्यामांसाठी दर्जेदार सूत्रसंचालनाची अपेक्षा केली जाते. बदलत्या काळात सूत्रसंचालन हे केवळ दोन कार्यामांच्या मधील जागा भरून काढणे एवढ्यापुरते मर्यादित राहिले नसून कार्यामाचा तो एक महत्त्वाचा भाग बनला आहे. भाऊ मराठे, मंगला खाडिलकर, धनश्री लेले, सुधीर गाडगीळ, स्वाती वाघ, जितेंद्र जोशी, डॉ. निलेश साबळे यांसारख्या सूत्रसंचालकांनी या क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. बहुश्रुतता, हजरजबाबीपणा, प्रसंगावधान, बोलण्यातील सहजता सूत्रसंचालकाकडे असणे गरजेचे आहे.
8. अध्यापन :  अध्यापन हे सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे क्षेत्र असल्याने स्वाभाविकपणे या क्षेत्राकडे अनेकांचा ओढा असतो. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, पदवी व पदव्युत्तर स्तरावरील अध्यापनात मराठी भाषा विषय घेऊन व योग्य ती शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यास अध्यापन क्षेत्रात प्रवेश करता येईल. आजच्या घडीला प्रचंड स्पर्धा असली तरी गुणवत्ता आणि चिकाटी असल्यास नक्कीच यश मिळवता येईल.
9. मुद्रित शोधन : मराठी भाषेच्या लेखनविषयक नियमांची माहिती करून घेतल्यास मुद्रित शोधनाचे नवे दालन व्यवसाय म्हणून खुले होऊ शकेल. वृत्तपत्रे, नियतकालिके, पुस्तकनिर्मितीक्षेत्र तसेच मराठी भाषेत लिहिलेला कोणताही मजकूर नियमाबरहुकून तपासण्याचे काम बहुतांशवेळेस घरबसल्या करता येते. आज मुद्रितशोधनतज्ज्ञांची कमतरता असल्याने नवी संधी म्हणून याकडे पाहता येईल.
10. केंद्रीय व महाराष्ट्र लोकसेवा आयोग : एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी आणि अन्य स्पर्धा परीक्षांध्येही मराठी भाषेला महत्त्वाचे स्थान आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेत 300 गुणांचा द्वितीय भाषेचा पेपर म्हणून मराठी विषय निवडता येतो, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेतही मराठी भाषा महत्त्वाची ठरते. मुख्य परीक्षेत निबंधलेखन, उतार्‍यावरील प्रश्‍न, व्याकरण आदी घटकांवर आधारित 100 गुणांचा पेपर असतो. याशिवाय अन्य स्पर्धा परीक्षांमध्येही मराठी भाषा विषय निर्णायक ठरू शकतो.
11. संगणक आणि मराठी : संगणकाने मानवी जीवन व्यापून टाकले आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरू नये. मराठीत टंकलेखन करण्याची गरज मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येते. वृत्तपत्रे, नियतकालिके, शासकीय दस्तावेज, शैक्षणिक साहित्य यांपासून एम.फिल, पीएच.डी प्रबंधांचे टंकलेखन अलीकडे संगणकावर करून त्यात हवा तसा बदलही करता येतो. महाजालावरील मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीसाठीही मराठी टंकलेखन व अन्य कौशल्ये महत्त्वाची ठरतात. संगणक व मराठी यांचे उत्तम ज्ञान असल्यास हा अर्थार्जनाचा चांगला स्त्रोत आहे.
12. व्यावहारिक/ कार्यलयीन कामकाज  :  कार्यालयीन पत्रव्यवहार, इतिवृत्त, अहवाल, टिप्पणी यांमध्ये भाषिक कौशल्यांची कसोटी लागते. शासनदरबारी प्रशासकीय भाषेचा अभ्यास असणार्‍या तज्ज्ञांची नियुक्ती केली जाते. शासननिर्णय, शासकीय परिपत्रके तयार करण्यासाठी प्रशासकीय भाषेचा अभ्यास आवश्यक ठरतो. व्यावहारिक भाषेपेक्षा वेगळ्या पारिभाषिक संकल्पना यात वापरल्या जातात. ही परिभाषा आव्हानात्मक असली तरी त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे.
भाषासंशोधन, व्याकरण, भाषाशास्त्राभ्यास या क्षेत्रांमध्येही संधी शोधण्याचा प्रयत्न करायला हवा. याशिवाय वक्तृत्व कला, मुलाखत, जाहिरात, पुस्तक प्रकाशन संस्था, छपाई, शैक्षणिक साहित्यनिर्मिती, मार्गदर्शन आणि समुपदेशन अशी अनेक दालने आज खुली झाली आहेत. कला प्रकारांच्या मुळाशी भाषा महत्त्वाची भूमिका बजावताना दिसते. कीर्तन, भजन, लावणी, भारूड, पोवाडा, गोंधळ यांच्या उत्तम सादरीकरणासाठी भाषिक प्रभुत्व आवश्यक आहे. महाराष्ट्रात मराठी भाषिक समाज बहुसंख्य असल्याने भाषिक व्यवहार मराठीत होत असतात. त्यामुळे अन्य व्यवसायांमध्येही मराठी महत्त्वाची ठरते.  झापडबंदपणे कोणत्याही व्यवसायाकडे न पाहता दूरदृष्टी व सृजनशीलपणे पाहिल्यास असंख्य व्यावसायिक संधी दिसू लागतील. यासाठी दैनंदिन व्यवहार मराठीतून करण्याचा आग्रह धरला पाहिजे. मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळेल तेव्हा मिळेल, परंतु खर्‍या अर्थाने तिला लोकभाषेचा दर्जा मिळवून द्यायला हवा. न्यूनगंड, अल्पसंतुष्टता, विचारांतील साचेबद्धता, संकुचितता यांसारख्या तुटींवर मात करून बदलत्या काळाचा आणि उभ्या ठाकलेल्या आव्हानांचा मुकाबला करण्याची वृत्ती, सकारात्मक दृष्टिकोन, ज्ञान-कौशल्यांतील अद्ययावतता आणि संकटातून संधी शोधण्याची हातोटी असेल तर भाषेच्या भवितव्याची निष्फळ चिंता करण्याची आवश्यकता उरणार नाही.
                                                                                                                                                                                                       -प्रा. अनिल मांझे
                                                                                                                                                                                                    साठ्ये महाविद्यालय, पार्ले