डहाणू शहरातील न्यायालयाच्या मागील बाजूच्या सती पाडा परिसरातील एक 17 वर्षीय युवकास कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा युवक मुंबईस्थित के. ई. एम. हॉस्पिटलमध्ये कुठल्याशा शस्त्रक्रियेसाठी दाखल होता. मात्र सध्या तातडीच्या नसलेल्या शस्त्रक्रिया पुढे ढकलून कोरोनाच्या उपचाराला प्राधान्य दिले जात असल्याने, हा युवक काही दिवस हॉस्पिटलमध्ये दाखल राहून डहाणूत परतला. डहाणूत परतताच त्याने प्रथम उप जिल्हा रुग्णालय गाठले. तेथे तपासणी केली असता, कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र के. ई. एम. रुग्णालयातील आरोग्य सेविकेला कोरोना बाधा झाल्याने, ह्या युवकाला होम क्वारन्टाईन न करता त्याला आशागड येथील आश्रमशाळेत इन्स्टीट्यूशनल कॉरन्टाईन करण्यात आले. तेथे तपासणी केली असता, त्याचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास व लक्षणे नसल्याने, पुन्हा तपासणी केली जाणार आहे.
डहाणूच्या बाजारपेठ बंदची माहिती अधिकृत नाही: एखाद्या परिसरात कोरोनाचा रुग्ण आढळल्यास तो परिसर प्रतिबंधीत केला जातो. मात्र तशी घोषणा अजून झालेली नाही. हा रुग्ण मुंबईतून डहाणूत आल्यानंतर परस्पर, इनस्टीट्यूट मध्ये दाखल असल्याने, तो सती पाडा येथील लोकांमध्ये मिसळलेला नाही. त्यामुळे प्रतिबंधीत क्षेत्र घोषित करण्याबाबत शासन काय निर्णय घेते, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.
