पालघर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; उद्यापासून जिल्ह्यात गांभीर्याने Lock Down ची अंमलबजावणी!

0
2036

दि. 31.03.2020: पालघर तालुक्यातील उसरणी येथील 50 वर्षीय कोरोना संशयीत रुग्णाचा आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
हा रुग्ण 28 मार्च रोजी सफाळे येथील पार्थ रुग्णालय येथे सुका खोकला, ताप व श्वसनास त्रास होत असल्याने उपचारासाठी आला होता. त्याला कोरोना बाधा झाल्याची शंका आल्याने पालघर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याला कोरोना संशयीत रुग्ण म्हणून दाखल करुन घेतले व व्हेंटीलेटर वर ठेवून आवश्यक ते उपचार सुरु करण्यात आले. 29 मार्च रोजी त्याच्या घश्याचे नमुने कस्तुरबा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले. आज त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. व सायंकाळी त्याचा मृत्यू झाला.
हा रुग्ण परदेशात गेलेला नसल्यामुळे त्याला कोरोनाची लागण कशी झाली याचा मागोवा काढण्यात येत आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात येत आहे.
पालघर जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या या पहिल्या मृत्यूमुळे प्रशासन सक्त झाले असून उद्यापासून जिल्ह्यामध्ये कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. उद्यापासून अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त विनाकारण रस्त्यावर उतरणाऱ्या व्यक्तींची वाहने जप्त करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.