दौलतबानु मेरवान खोदादाद ईराणी डायलिसिस सेंटर लवकरच सेवेत

प्रतिनिधी/डहाणू, दि. 10 : डहाणू तालुका व परिसरातील मुत्रपिंडाच्या रुग्णांसाठी येत्या 14 सप्टेंबरपासून डहाणूतच डायलिसिस उपचाराची सोय उपलब्ध होणार असुन दौलतबानू मेरवान खोदादाद ईराणी या नावाने लवकरच सदर डायलिसिस सेंटर सुरु करण्यात येणार आहे.
रोजच्या धकाधकीच्या जीवनात, मानसिक ताण तणावामुळे नागरीकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यातही किडणीच्या आजाराचे रूग्ण व त्यांचे नातेवाईक फारच त्रस्त होत असतात. अशा रुग्णांना विरारपासून पुढे मुंबई व वलसाड नवसारी येथे डायलिसिससाठी न्यावे लागते. काहींना महिन्यात 4 ते 5 वेळा डायलिसिससाठी जावे लागते. त्यामुळे रुग्णांना मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. आता ही सोय डहाणूत मिळणार आहे. दौलतबानू मेरवान खोदादाद ईराणी या डायलिसिस सेंटरचे व्यवस्थापन डॉ. सुनील नायर संचलीत विवो किडणी केअर (मुंबई) या संस्थेद्वारे करण्यात येणार असून डॉ. अनुराग शुक्ला नेफरोलॉजिस्ट हे रुग्णांवर डायलिसिसच्या अद्ययावत मशिनद्वारे उपचार करणार आहेत. एका वेळी तीन मशिन्स सकाळी 7 ते 11, 11 ते 3 व 3 ते 7 या वेळेत कार्यरत राहणार आहेत. हे सेंटर शीतल नर्सिंग होम, एस.टी. डेपो समोर, सरोवर हॉटेलच्या मागे, डहाणू रोड (पश्चिम) येथे सुरू होणार आहे. अधिक माहितीसाठी इरवीन प्रित सिंह (दूरध्वनी क्रमांक 9872833232) यांच्याशी संपर्क साधता येईल. आतापर्यंत 17 रुग्णांची नोंदणी झाली असुन डहाणूत प्रथमच मिळणार्या या सेवेचा गरजूंनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.