केंद्राच्या जनजागृती महाअभियानाचे जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते उद्घाटन

0
1337

पालघर, दि. 26 : प्रादेशिक लोक संपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा विभाग) व भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित जनजागृती महा अभियानाचे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते आज उद्घाटन करण्यात आले. या अभियानांतर्गत मल्टीमीडिया व्हॅनद्वारे व्हिडीओ आणि कलापथकाच्या माध्यमातून कोविड लसीकरण आणि आत्मनिर्भर भारत अभियानाविषयी संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, जिल्हा आरोग्य अधिकारी दयानंद सूर्यवंशी, क्षेत्रीय प्रचार अधिकारी पराग मांदळे, जिल्हा लसीकरण अधिकारी मिलिंद चव्हाण, किशोर चव्हाण, आकाश खाडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. गुरसळ म्हणाले की, कोविडचा धोका अजून संपलेला नाही. म्हणून लोकांना खबरदारी घेण्यासाठी प्रेरित करण्याच्या दृष्टीने या अभियानाची खूप मदत होईल. जिल्ह्यातील कोविडच्या दृष्टीने संवेदनशील भागांमध्ये या अभियानाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.