राजतंत्र न्यूज नेटवर्क
दि. ३, डहाणू: ज्येष्ठ पत्रकार आशाद शेख यांना डहाणू येथील दिवाणी न्यायालयात मारहाण झाल्याची घटना घडली असून या कृत्याचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे.
आशाद यांनी ठाकुर मुख्तार खान या इसमाच्या विरोधात न्यायालयात बदनामी केल्याबद्दल खटले दाखल केले होते. काही महिन्यांपूर्वीच अशा ३ खटल्यांच्या निकालात न्यायालयाने खान यास दोषी ठरविण्यात शिक्षा सुनावली होती. आजही डहाणू न्यायालयात आशाद हे खान याचे विरोधात दाखल केलेल्या दाव्यासाठी न्यायालयात आले असताना खान याने न्यायालयाच्या आवारातच आशाद यांना शिवीगाळ व मारहाण केली.
घटना घडल्यानंतर खान यास लगेचच ताब्यात घेण्यात आले. आशाद यांनी या प्रकरणी डहाणू पोलीस स्टेशनमध्ये अदखलपात्र गुन्हा नोंदविला असून न्यायालयाकडे फिर्याद नोंदवली आहे. पोलीसांनी देखील स्वतंत्रपणे गुन्हा नोंदवून घेतला आहे. दरम्यान न्यायालयाने खान यास समज देऊन मोकळे केले असले तरी न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.