राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने बोईसरच्या उपसरपंच पदी भाजपच्या देविका मोरे

0
2245

शिवसेनेच्या अतुल देसाईंचा केला पराभव

वार्ताहर/बोईसर, दि. 1 : पालघर जिल्ह्यातील बहुचर्चित बोईसर ग्रामपंचायतीच्या उप सरपंच पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपच्या उपसरपंच पदाच्या उमेदवार देविका मोरे विजयी झाल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादी पक्षातून शिवसेनेत आलेल्या अतुल देसाई यांचा एका मताच्या फरकाने पराभव केला.

बोईसर ग्रामपंचायतीच्या उप सरपंचपदी असलेले भाजपचे राजेश करवीर यांनी राजीनामा दिल्यानंतर उपसरपंच पद रिक्त झाले होते. या रिक्त पदासाठी गेल्या 15 दिवसांपासून सर्वच पक्षांकडून वेगवेगळे डावपेच रचले जात होते. तर केंद्रापासुन गावपातळीवर युती असलेल्या भाजप-शिवसेनेची बोईसरमध्ये देखील युती व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली सुरू होत्या. खैरापाडा येथील शिवसेनेच्या वाट्याची पंचायत समितीची जागा शिवसेनेने भाजपला दिल्याने बोईसरमध्ये शिवसेनेला उप सरपंचपद मिळावे यासाठी शिवसेना आग्रही होती. मात्र तसे न करता व शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहाला न जुमानता बोईसर भाजपने थेट शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर काडीमोड घेतला असुन राष्ट्रवादीचा पाठिंबा घेत उपसरपंचपदी देविका मोरे यांना निवडून आणले आहे. या निवडणूकीत मोरे यांना 9 मते तर पराभूत अतुल देसाई यांना 8 मते मिळाली आहेत.