डहाणू, दि. 12 जून : डहाणू तालुक्यातील सरावली सजाचा तलाठी अनंत मडके याला हस्तकामार्फत 4 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे.
सारणी सजाचा तलाठी असलेल्या मडकेकडे सरावली सजाचा अतिरिक्त कार्यभार होता. प्रत्यक्षात अंकित राठोड नावाचा खासगी इसम सरावलीचे सर्व व्यवहार पहात असे. फिर्यादी कल्पेश रामसिंग पटेल यांनी त्यांच्या सासर्यांच्या जमिनीचा फेरफार टाकण्यासाठी सरवली तलाठी सजा कार्यालयात अर्ज केला होता. या कामासाठी मडके याने लाच म्हणून दहा हजार रुपयांची मागणी केली होती. मात्र याबाबत पटेल यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पालघर जिल्हा पथकाकडे संपर्क साधल्यानंतर खातरजमा करुन आज सायंकाळी 4 वाजता सापळा रचण्यात आला. त्यानुसार तलाठी कार्यालयात ठरलेल्या रक्कमेपैकी 4 हजारांची रक्कम स्वीकारताना अंकित याला रंगेहाथ अटक करण्यात आली. यावेळी तलाठी मडके स्वतः हजर असल्याने दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून डहाणू पोलीस स्टेशनमध्ये पुढील कायदेशीर सोपस्कार चालू आहेत.