400 जणांना गंडा, तिघे अटकेत

वार्ताहर/पालघर, दि. 9 : एका वर्षात पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून पालघरमधील खेड्यापाड्यातील नागरीकांना एका कंपनीने सुमारे 60 लाखांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली आहे. फसवणूक झालेल्या जवळपास चारशे जणांनी याविरोधात पालघर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असुन पोलिसांनी याप्रकरणी तिन जणांना अटक केली आहे.
सॅलवेशन ग्रुप ऑफ कंपनी असे सदर कंपनीचे नाव असुन माहीम येथील नंदन आणि जागृती म्हात्रे या दोघांनी पालघरमध्ये सदर कंपनीची शाखा उघडून पालघरसह अन्य तालुक्यातील लोकांना साखळी पद्धतीने प्रचार करत कंपनीचे सदस्य बनवले. सदस्य बनवतानाच कंपनीने त्यांच्याकडुन वर्षभरात तुमचे पैसे दुप्पट करुन देण्याचे आमिष दाखवत प्रत्येक महिन्याला त्यांच्याकडून एक विशिष्ट रक्कम गुंतवणूक म्हणून उकळली. अशाप्रकारे 400 पेक्षा जास्त सदस्य या कंपनीला जोडले गेले व त्यांनी सुमारे 60 लाख रुपयांची गुंतवणूक केली. कंपनीने सुरुवातीच्या काळात या सदस्यांना भरघोस मोबदला दिला. त्यामुळे सदस्यांना कंपनीवर विश्वास बसला व त्यांनी पुढे आपली गुंतवणूक सुरुच ठेवली. मात्र मागील दोन ते तीन वर्षात कंपनीकडुन गुंतवणूक केलेले पैसे व मोबदला मिळाला नसल्याने कंपनी चालवणार्या नंदन व जागृती म्हात्रे यांना सदस्यांनी अनेकवेळा जाब विचारला. मात्र प्रत्येकवेळी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तर अनेक सदस्यांनी त्यांना दुरध्वनीद्वारे तसेच स्वत: त्यांच्या घरी जाऊन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघेही पळवाट काढत असे. मागील अनेक महिन्यांपासुन हा प्रकार सुरु असल्याने अखेर आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर कंपनीच्या सुमारे 400 सदस्यांनी काल, बुधवारी एकत्र येत पालघर स्टेशनमध्ये धाव घेतली व कंपनीविरोधात तक्रार दाखल केली.

या तक्रारीवरुन पालघर पोलिसांनी गुन्हा नोंदवत नंदन आणि जागृती म्हात्रे या दोघांसह कंपनीचा संचालक संजू नुन याला भाईंदर येथून अटक केली आहे. दरम्यान, तिघांना पालघर सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना 10 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.