
राजतंत्र न्यूज नेटवर्क/बोईसर, दि. 10 : मोबाईल चोरीवरुन झालेल्या बाचाबाचीचा राग मनात धरुन एका जोडप्यावर अॅसिड हल्ला करुन त्यांना जिवेठार मारणार्या आरोपीला सत्र न्यायालयाने दोनवेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे. गुड्डू उर्फ क्रिश यादव (वय 25) असे आरोपीचे नाव असुन 4 वर्षांपुर्वी ही घटना घडली होती.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोलवडे येथे राहणार्या आरोपी गुड्डूने 4 नोव्हेंबर 2015 रोजी तो काम करत असलेल्या कंपनीतील एका इसमाचा मोबाईल चोरी केला होता. सदर इसमाला ही बाब समजल्यानंतर गुड्डू व त्याच्यात बाचाबाची झाली होती. या गोष्टीचा राग मनात धरुन गुड्डूने दोन दिवसानंतर म्हणजेच 6 नोव्हेंबर 2015 रोजी कंपनीच्या ऑफिसच्या माळ्यावर झोपलेला सदर इसम व त्याची पत्नी गितादेवी अशा दोघांवर कंपनीतच तयार केले जाणारे ज्वलनशिल रसायन (अॅसिड) संपुर्ण अंगावर ओतले होते. या अॅसिड हल्ल्यात दोघे पती-पत्नी गंभीर जखमी झाले होते. अखेर दोघांचाही त्याच दिवशी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यानंतर आरोपी गुड्डू याच्याविरोधात बोईसर पोलीस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करणारे बोईसर पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरिक्षक के. एस. हेगाजे यांनी याप्रकरणी आरोपीविरोधात सबळ पुरावे गोळा करुन सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या पुराव्यांना ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी गुड्डूला या कु्रर गुन्ह्याप्रकरणी भारतीय दंड विधान संहितेच्या 302 अन्वये दोन वेळा फाशीची शिक्षा सुनावली आहे.